नवी दिल्ली : पैशाच्या वादातून नात्यांमध्ये वितुष्ठ येते हे प्रत्येकवेळी आपण पाहत आलो आहोत. एवढेच नाही तर काही जणांचा जीव देखील यामुळे गेला असल्याचे समोर आले आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडली आहे. बंगळुरुमध्ये पैशाच्या वादातून पोटच्या पोराला एका व्यावसायिकाने जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
बंगळुरुत पैशांच्या वादातून पित्यानेच मुलाला जिवंत जाळलं; मुलाचा मृत्यू तर वडिलांना अटक#Karnataka #Bangalore #DisturbingVisuals pic.twitter.com/FYARjlktbm
— Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) April 8, 2022
बंगळुरूमध्ये अकाऊंट्सवरुन झालेल्या वादातून पित्याने रस्त्यातच मुलाला जिवंत जाळून टाकले. रुग्णालयात उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. १ तारखेला वाल्मिकी नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत मुलगा अर्पित इमारतीमधून बाहेर येताना दिसत आहे. यावेळी आरोपी वडील सुरेंद्र त्याच्या मागून येतात आणि माचिसची काडी पेटवून त्याच्या अंगावर फेकतात. मुलगा यावेळी तिथेच उभा असतो. पहिली काडी वाया गेल्यानंतर वडील दुसरी काटी पेटवून टाकतात आणि मुलाचे शरीर पेट घेतं. यानंतर तो तसाच आरडाओरडा करत पळत जाताना दिसत आहे.
स्थानिकांनी धाव घेत यावेळी आग विझवली आणि अर्पितला रुग्णालयात दाखल केले. ६० टक्के भाजलेला अर्पित रुग्णालयात दोन दिवस मृत्यूशी झुंज देत होता. गुरुवारी सकाळी उपचारामदरम्यान त्याचे निधन झाले. शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
सुरेंद्र यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. सुरेंद्र यांनी अर्पितकडे १.५ कोटींचा हिशोब लागत नसल्याने जाब विचारला असता तो देऊ शकला नाही. यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती मिळत आहे.