पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते पदाचा पदभार नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज दुपारी एक वाजता स्विकारला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ही निवड करण्यात आली आहे.
नाना काटे म्हणाले कि, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना हिताच्या प्रश्नासाठी आपण सभागृहात शास्तीकर, कचरा, आरोग्य, भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकामे व इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सत्ताधाऱ्यांना भाग पाडू व सभागृहात याबद्दल आवाज उठवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असेही त्यांना म्हंटले आहे.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आपला कार्यकाळ संपल्यामुळे 9 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. यानंतर या पदासाठी राष्ट्रवादीमध्ये तीव्र स्पर्धा रंगली होती. या पदासाठी नाना काटे यांच्यासह जावेद शेख, वैशाली घोडेकर, राजू मिसाळ आणि अजित गव्हाणे स्पर्धेत होते. सर्वच स्पर्धक तगडे असल्याने गेल्या आठवडाभर निवडीचा विषय राष्ट्रवादीच्या पातळीवर चांगलाच चर्चेचा बनला होता. परंतु, यापूर्वी पिंपरी आणि भोसरी विधानसभेतील नगरसेवकाला यापदावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे चिंचवड विधानसभेतून नाना काटे यांना संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती, अखेर ती खरी ठरली.
दरम्यान, नाना काटे यांचा महापालिकेतील दांडगा अनुभव आहे. त्यातच सर्वांना सांभाळून घेणारे नेते व राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख त्यांची आहे. त्यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात “आयटीयन्स’ रहिवाशी असून, या मतदाराबरोबरच उच्चभ्रू मतदार राष्ट्रवादीकडे वळविण्यासही ही नियुक्ती फायदेशीर ठरणार आहे.