मुंबई – अभिनेत्री ‘क्रिती सॅनन’ ही बॉलिवूडमधील सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने टायगर श्रॉफ सोबत 2014 मध्ये हिरोपंती या चित्रपटातून पदार्पण केले आणि तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही. तिने ‘मिमी, बरेली की बर्फी, लुका छुप्पी… या सारख्या चित्रपटांमध्ये आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळेच आज बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांमध्ये क्रिती सॅननचे सर्वात आधी घेतलं जाते.
हीरोपंती चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणारी क्रिती आता पुन्हा एकदा आगामी ‘हीरोपंती-2′ चित्रपटात झळकणार आहे. क्रितीने यामध्ये हीरोईनची मुख्य भूमिका साकारली नसली तरी या चित्रपटात ती एका गाण्यात दिसून येणार आहे. “व्हिसल बजा 2.0’ या गाण्यात ती टायगरसमवेत थिरकताना दिसून येते.
नुकतेच हे गाणे प्रसिद्ध करण्यात आले. 2014 मध्ये आलेल्या ‘हीरोपंती’मधील ‘व्हिसल बजा’ गाण्यातील दोघांची केमिस्ट्री लोकांना आवडली होती. आता 2022 मध्ये पुन्हा हे गाणे दोघांनी पडद्यावर सादर केले आहे.
या गाण्याला मिका सिंह आणि नीती मोहन यांनी आवाज दिला आहे. सध्या हे गाणं चांगलंच व्हायरल झालं असून, लोकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान, ‘हीरोपंती-2’ हा चित्रपट येत्या 29 एप्रिलला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.