नवी दिल्ली : भाजपचे मंत्री रोज कोणते ना कोणते वादग्रस्त विधान करताना पाहायला मिळतात. त्यातच आता मध्य प्रदेशमध्ये भाजपाच्या एका मंत्र्याने राज्यातील विरोधकांना भरसभेतून धमकीवजा इशारा दिला असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडोओमध्ये संबंधित भाजपा मंत्र्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपात सामील व्हा. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा” अशा आशयाची धमकी दिली आहे.
भाजपा मंत्र्यांनी केलेल्या या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. महेंद्रसिंह सिसोदिया असे वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्याचे नाव आहे. ते मध्य प्रदेशचे पंचायत मंत्री आहेत. महेंद्रसिंग सिसोदिया हे नुकतेच गुना जिल्ह्यातील रुठियाई येथे एका राजकीय कार्यक्रमाला आले होते. यावेळी केलेल्या जाहीरसभेत त्यांनी हे विधान केले.
राघोगढ़ में कांग्रेसियों से बोले पंचायत मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया “भाजपा में आ जाओ नहीं तो 2023 के बाद बुलडोजर तैयार है”
मंत्री जी,आपका बुल डोजर अंग्रेजों से बड़ा नहीं है,हम उनसे लड़े हैं.@OfficeOfKNath pic.twitter.com/t0ZvVtd8Oh— KK Mishra (@KKMishraINC) January 19, 2023
“भारतीय जनता पार्टीत सामील व्हा. हळूहळू आमच्या बाजुने (सत्ताधारी पार्टीत) या. २०२३ ला विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात भाजपा सरकार स्थापन होईल. त्यानंतर मामाच्या बुलडोझरसाठी तयार राहा,” असे विधान सिसोदिया यांनी केले. खरंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ‘मामा’ या टोपणनावाने ओळखले जातात. अलीकडच्या काळात शिवराज सिंह यांनी गुन्हेगारांविरोधात कठोर धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार ते विविध गुन्ह्यांतील आरोपींच्या घरांवर कथित बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत बुलडोझर चालवत आहेत. याच पार्श्वभूमीवर सिसोदिया यांनी मध्य प्रदेशातील विरोधक काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांना धमकी दिली.
दरम्यान,सिसोदिया यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप व्यक्त करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट केले. अशी भीती दाखवून काही उपयोग नाही. काँग्रेस पदाधिकारी असल्या धमक्यांना घाबरणार नाहीत. राघवगडवासीय निर्भयपणे मतदान करतील, असं दिग्विजय सिंह ट्विटमध्ये म्हणाले.