मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भेटी विषयी स्वत: राज ठाकरे सांगतानाचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.
मनसेने “जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात, राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अखेरचा ‘राज’कीय संवाद !” असे ट्वीट केले आहे.
जा लढ, मी आहे…
काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात…
राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा ‘राज’कीय संवाद ! pic.twitter.com/q6FYy9SmDP— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 23, 2023
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ट्वीट करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये राज ठाकरे यांनी, “मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट पण निघताना माझ्याबरोबर तेव्हा मनोहर जोशी होते, मनोहर जोशी रूमच्या बाहेर गेले आणि ते रूमच्या बाहेर गेल्यावर मला बाळासाहेबांनी बोलावलं, माझ्यासमोर हात पसरले आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं.”असे म्हणताना दिसत आहेत.
ह्या मनगटास तूच शिकवली लढण्याची वहिवाट,
कोट कोट हृदयांचा केवळ एक हृदयसम्राट !
🧡 pic.twitter.com/hN9wDiykFu— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 23, 2023
पुढे बोलताना त्यांनी त्या व्हिडिओत, “जेव्हा मुलाखतकाराने मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेंचं बंडं आणि तुमचं बंड म्हटलं माझं बंड लावू नका त्यात. हे सगळेजण गेले हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलेलो आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला.” असेही राज ठाकरे म्हणले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून दोन्ही गटांमधील संघर्षही अद्याप संपलेला नाही. त्यातच आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदतही संपत आहे.