अश्‍लील वेबसाइटवर जाणारे आंबटशौकीन सायबर भामट्यांच्या जाळ्यात

व्हिडीओ कॉल आणि 'ब्लॅक ट्रुथ

पुणे – ऑनलाइन माध्यमातून अश्‍लील वेबसाइटवर जाणारे आंबटशौकीन सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत, असे “सावज’ टिपल्यानंतर त्यांना हजारो रुपयांचा गंडा घातला जात आहे. मात्र, अशा प्रकरणात लूट झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात कोणत्या तोंडाने द्यायची, या विचारातून अनेकजण भामट्यांना पैसे देऊन “मिटवामिटवी’ करीत आहेत. अगदीच गळ्याशी प्रकरण आलेले काहीजण पोलिसांशी संपर्क साधत आहेत. दरम्यान, ब्लॅकमेलिंगचा हा नवा प्रकार पोलिसांनाही चक्रावून टाकणारा आहे.

इंटरनेटचे विश्‍व अफाट असताना यामध्ये चांगले आणि वाईट याची भिंत असते. आपणच आपल्या विचारातून ही भिंत टाकत असतो. परंतु, अनेकदा स्वैराचारातून मन उधाण वाऱ्याप्रमाणे सुटते.., आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकते. सध्या, असाच भावनिक खेळ करीत आंबटशौकिनांना सायबर भामट्यांकडून टार्गेट केले जात आहे.

अश्‍लील वेबसाइट अनेकवेळा चाळणारे युजर्स, अशा त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. रंगीबेरंगी वेबसाइट एक-दोनदा उघडल्यानंतर त्यावरील रींगल्या जाहिराती, फोन कॉल, व्हिडिओ कॉल, प्रायव्हेट चाट असा भडिमार सुरू होतो. उत्सुकता किंवा चुकून त्यावर क्‍लिक झाले की, सायबर भामटे अशा युजर्सला जाळ्यात ओढतात. यातूनच पुढे जुनाच फंडा नव्याने वापरला जाऊन युजर्सला ब्लॅकमेल केले जाते.

यामध्ये सर्वच वयोगटातील पुरुष अलगद अडकतात. रंगील्या वेबसाइट चाळणाऱ्यांची डिटेल्स आणि फोन नंबर मिळताच अशा युजर्सशी व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून चॅटिंग सुरू होते. पुरुषांना व्हिडिओ कॉल करून अश्‍लील संवाद साधला जातो. त्यानंतर हळूहळू ओळख वाढवून प्रायव्हेट (अश्‍लील) व्हिडिओ चॅट सुरू होते. यामध्ये समोरील महिला स्वत:चे कपडे काढून चॅटिंगला सुरुवात करते. असे चॅटिंग करण्याची मागणी समोरील पुरुषाकडेही होते. यानंतर हा व्हिडिओ कॉल सायबर भामटे रेकॉर्ड करतात.

त्यानंतर संबंधित युजर्सला फोन करून त्याचे व्हिडिओ वेबसाइटवर टाकण्याची धमकी देत मोठ्या रकमेची मागणी होते. पुणे शहराचा विचार करता गेल्या महिन्याभरात सात ते आठ जणांना अशाप्रकारे ब्लॅकमेलिंग केले असल्याची अधिकृत माहिती सायबर पोलिसांनी दिली.

व्हिडिओ कॉलवरील तरुणी ‘रेकॉर्डेड’
यासंदर्भात सायबर तज्ज्ञांशी चर्चा केली असता, समोरून एखादी तरुणी व्हिडिओ कॉल करून अंगावरचे एक एक कपडे काढत असताना आपल्याशी बोलत असते. मात्र, हे चित्रण अगोदरच रेकॉर्ड केलेले असते. हेच चित्रण वापरून अनेकांना ब्लॅकमेल करण्यात येते. मात्र, फसलेल्या व्यक्‍तीला समोरील तरुणीने खरोखरच आपल्याशी व्हिडिओ चॅट करताना कपडे काढले आहेत, असे वाटते. तर दुसरीकडे सायबर चोरटे संबंधित व्यक्‍तीला व्हिडिओ कॉलला मिळत असलेला प्रतिसाद रेकॉर्ड करतात.

फसलेल्या तरुणाची कहाणी…
काही दिवसांपूर्वी मदन (नाव बदललेले आहे) याला व्हॉट्‌सऍपवर एका तरुणीचा व्हिडिओ कॉल आला, त्याने कॉल उचलला असता सदर तरुणी नग्न अवस्थेत बोलत असल्याचे दिसले. तिने मदनला विश्‍वासात घेतले आणि त्यालाही नग्न अवस्थेत येऊन बोला, अशी लडिवाळ विनंती केली. जोशात आलेल्या मदननेही नग्न अवस्थेत बोलायला सुरुवात केली.

सायबर गुन्हेगाराने हा कॉल ऍपद्वारे रेकॉर्ड केला. मदन याला दुसऱ्या दिवशी कॉल आला, तुमचे नग्न फोटो आणि व्हिडिओ आमच्याकडे आहेत, असे सांगून 10 हजार रुपये ऑनलाइन जमा करण्यास सांगितले. पैसे दिले नाहीतर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी दिली. मदनने पैसे जमा केले. परंतु, सायबर गुन्हेगाराने पुन्हा एक-दोन वेळा कॉल करून ब्लॅकमेल करीत रक्‍कम उकळली. हा त्रास वाढू लागल्याने अखेर मदनने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

सायबर गुन्हेगारांकडून अशाप्रकारे व्हॉट्‌स ऍपद्वारे व्हिडिओ कॉल केले जात आहेत. तसेच नागरिकांना नग्न होण्यास भाग पाडून त्यांचे व्हिडिओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करीत ऑनलाइन माध्यमातून रक्‍कम घेण्याचे प्रकार वाढत आहेत.
– जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.