#video: भाजपा आमदार बनले ट्रक ड्रायव्हर; स्टिंग ऑपरेशन करून उघड केला पोलिसांचा धक्कादायक चेहरा

मुंबई :  चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी एक स्टींग ऑपरेशन केले आहे. यात त्यांनी पोलिसांचा धक्कादायक चेहरा सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.  कन्नड तालुक्यात घाटात पोलिसांकडून बेकायदेशीररित्या वसुली केली जात असल्याचे वास्तव त्यांनी या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघड केले आहे.

विशेष म्हणजे आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रक चालक म्हणून या घाटातील नाकाबंदीमधून जाताना कशाप्रकारे लाच द्यावी लागते हे दाखवण्यात आले आहे. हे व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून भाजपा समर्थकांनी आमदार चव्हाणांनी केलेल्या या स्टींग ऑप्रेशनवरुन त्यांचं कौतुक केले आहे. यासंदर्भातील व्हिडीओ चव्हाण यांनी शूट केले असून ते सविस्तर माहितीसहीत फेसबुकवर पोस्ट केले आहेत.

“दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो. गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका तासंतास अडकून पडतात, यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे,” असे चव्हाण यांनी म्हटले आहे. केवळ वसुलीसाठी प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाचा स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश करण्यात आल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

“महावसुली आघाडी सरकारच्या आशिर्वादाने चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, याची खातरजमा करण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसह काल (२४ नोव्हेंबर २०२१ च्या) रात्री वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी मी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला असता त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी माझ्याकडे जाताना व येताना ५०० रुपयांची मागणी केली असता त्यांना मी यात थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला.

नंतर मी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला मग मी देखील पोलिसांची मग्रुरी पाहून खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी मला ओळखले व त्यांनी पळ काढला,” असे आमदार चव्हाण यांनी घडलेल्या घटनाक्रमाबद्दल बोलताना सांगितले आहे.

“सचिन वाझे जेलमध्ये गेल्याने १०० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणी अश्या वसुल्या सुरु आहेत की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे, एकीकडे चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे गुरे चोरीला जात असताना तिथे बंदोबस्त करायला पोलिसांना वेळ नाही. महावसुली आघाडी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहेत. १५ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाकडे कानाडोळा करतात मात्र पोलिसांच्या मार्फत महावसुली जोरात सुरु आहे.

आज जिल्हा पोलीस अधिक्षक महोदय यांनी सदर घटना व माझ्या तक्रारी च्या अनुषंगाने जळगाव येथे सर्व प्रमुख पोलीस अधिकारी यांची बैठक बोलावली असून मी त्याठिकाणी चाळीसगांव तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे, हफ्ता वसुली, शेतकऱ्यांचे गुरे चोरी जाण्याचे वाढलेले प्रमाण, घरफोडी, चोरी, महिला व अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार या अनुषंगाने चाळीसगांव वाश्यांच्यावतीने माझी भूमिका मांडणार आहे,” असेही चव्हाण म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.