नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडून देखील महिलांवर अत्याचार होत असल्याचं चित्र आहे. कानपूरमधून एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये एक पोलिस कर्मचारी महिलेच्या अंगावर बसून तिला मारहाण करत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कानपूरच्या एसएसपींनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. लखीमपूर येथील दुर्गदासपूर गावातील ही घटना आहे.
येथे पुखराया पोलीस चौकीचे प्रमुख महेंद्र पटेल आणि चार शिपाई एका प्रकरणात महिला कॉन्स्टेबलला न घेता आरोपी सुरजीत यादव याच्या घरी तपासासाठी गेले होते. यादरम्यान पोलिसांनी शिवम नावाच्या एका तरुणाला आरोपीच्या घराचा पत्ता विचारला. यावेळी शिवमसह त्याचे कुटुंबीय आणि पोलिसांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला.
हा वाद सुरू असताना शिवमच्या घरातील महिला बाहेर आल्या. यावेळी पोलिस आणि महिलांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर महिलेची सून देखील आली. यावेळी पोलीस आणि महिलांमध्ये धरपकड झाली. व्हिडीओमध्ये पोलिस महिलेच्या अंगावर बसून तिला धमकवताना दिसत आहे.
https://t.co/R6xsHpUV4r pic.twitter.com/oktTiMghWl
— Kanpur Dehat Police (@kanpurdehatpol) July 17, 2021
याच घटनेचा पोलिसांनी देखील व्हिडीओ केला आहे. यामध्ये महिलेनेच पोलीस कर्मचाऱ्यांसोबत गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे.