नागपूर, दि. 9 – दरवर्षी मकर संक्रांतीला अर्थ 14 जानेवारी रोजी येत असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या स्थापना दिनानिमित्त प्रतिवर्षी विविध साहित्य पुरस्कार देण्यात येतात. येत्या 14 जानेवारीला विदर्भ साहित्य संघाच्या झाशीची राणी चौकातील “रंगशारदा’ सभागृहात विदर्भ साहित्य संघाचा 98 वा स्थापनादिन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात कोल्हे यांच्यासह अनेकांना विविध साहित्यविषयक पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. त्यामध्ये संघाचा “ग. त्र्यं माडखोलकर जीवनव्रती पुरस्कार’ विख्यात लेखक यशवंत मनोहर यांना दिला जाणार आहे.
यामध्ये यावर्षी विख्यात कादंबरीकार मुक्त पत्रकार आणि “दैनिक प्रभात’चे स्तंभलेखक प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्या “पंगतीतील पान’ या कादंबरीला प्रतिष्ठेचा पु. य. देशपांडे पुरस्कार जाहीर झाला आहे अविनाश कोल्हे यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश आघाडीच्या वृत्तपत्रांसाठी ते राजकीय विश्लेषक म्हणून स्तंभ लेखनही करत असतात.
“युगवाणी’ नियतकालिकातील सर्वोत्तम लेखासाठीचा कवी ग्रेस स्मृती पुरस्कार संजय गणोरकर (अमरावती) यांना, कुसुमानील स्मृती समीक्षा पुरस्कार नामदेव कांबळे (वाशिम) आणि शरच्चंद्र मुक्तीबोध स्मृती पुरस्कार मनोज पाठक (शेगाव) यांना प्रदान केला जाणार आहे. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये चंद्रकांत वानखेडे, डॉ. प्रमोद कोलवाडकर, रवींद्र जवादे, डॉ. श्याम धोंड, डॉ. विजय राऊत, गजानन फुसे, नितीन नायगावकर, शुभंकर कुलकर्णी यांच्यासह (कै.) उल्हास साबळे आणि विलास जोशी यांचा समावेश आहे. संघाच्या सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार वर्धा शाखेला दिला जाणार आहे.