येत्या ४८ तासांत विदर्भात उष्णतेची लाट

पुणे – सूर्यनारायण दिवसेंदिवस चांगलेच तापल्यामुळे राज्यातील काही शहरांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. दुपारच्यावेळी अंगाची लाही लाही होत असून, आता “चटका सोशेनासा’ झाला आहे. दरम्यान, पुढील 48 तासांत विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही शहरांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी (दि.25) सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला येथे 45.1 अंश सेल्सिअस झाली.

गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील उर्वरीत भागांत किंचीत वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर कमाल तापमान झपट्याने वाढत आहे. बहुतांश शहरातील कमाल तापमानाने 43 अंशाच्या पुढे मजल मारली आहे. विशेषत: मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश आहे. येत्या 27 ते 29 एप्रिलदरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर तुरळक ठिकाणी तीव्र लाट येण्याची शक्‍यता आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. तर दि. 28 आणि 29 एप्रिल रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

पुणे शहराचा पारा 41 अंशांच्या पुढे
शहरातील कमाल तापमानाने 41 अंशाच्या पुढे मजल मारली आहे. त्यामुळे दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान उन्हाचा चटका असह्य करणारा आहे. सूर्यनारायण अक्षरश: आग ओकत असल्यामुळे दोन दिवसांपासून दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. तर, रात्री गरमाईने नकोसे होत आहे. त्यातच गुरुवारी दिवसभर शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडीत असल्याने उकाड्यामुळे घरात थांबूही शकत नव्हते. गुरुवारी (दि.25) शहरात 41.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरातील कमाल तापमान वाढण्याची शक्‍यता आहे. आकाश निरभ्र राहिल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला 45.1, ब्रह्मपुरी 44.7, चंद्रपूर 44.2, परभणी 44.1, अमरावती 44, वर्धा 43.9, नागपूर 43.4, यवतमाळ 43, मालेगाव 42.8, बीड 42.7, गोंदिया आणि वाशिम 42, लोहगाव 41.5, बुलढाणाला 41.7, औरंगाबाद, सोलापूर 41.6, पुणे 41.1, उस्मानाबाद 41, नाशिक 40.9, सातारा 40.6, कोल्हापूर 40.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.