पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघ इतर ठिकाणांच्या तुलनेत विकासामध्ये मागे पडला आहे. वर्षानुवर्षे त्याच त्या मुद्द्यावर मते मागून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना जागा दाखविण्याची वेळ आली असून या मतदारसंघाच्या विकासासाठी राहुल कलाटेंना विजयी करा, असे आवाहन “जय मल्हार’ फेम देवदत्त नागे यांनी केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ जुनी सांगवी येथे गुरुवारी (दि. 17) जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार राहुल कलाटे, नगरसेवक नवनाथ जगताप, प्रशांत शितोळे, वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, पृथ्वीराज साठे, संदेश नवले, मनसेचे राजू साळवे, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, शाम जगताप, शिवा पाडुळे, तानाजी जवळकर, प्रकाश ढोरे, कुमार ढोरे, कुंदन कसबे, अमरसिंग आदियाल, उज्वला ढोरे, सोनाली जम, सुषमा तनपुरे, बाबासाहेब ढमाले, निखील चव्हाण, सुरेश सकट, पंकज कांबळे सर्वपक्षांचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना नागे म्हणाले, चिंचवडमध्ये सध्या प्रस्थापितांविरोधात सुशिक्षित तरुण लढत देत आहे. मतदारसंघाचा विकास करणे येड्या गबाळ्याचे काम नाही. आपला लोकप्रतिनिधीही सुशिक्षित, तरुण आणि तडफदार असणे गरजेचे आहे. मतदारसंघाचा विकास करण्याची, स्वत: त्रास सहन करून जनतेसाठी काम करण्याची उर्मी धमक राहुल कलाटे यांच्याकडे आहे. 21 तारखेला आपल्याला जोरदार “बॅटींग’ करायची आहे. विकासासाठी परिवर्तन तुम्ही नक्कीच घडवाल, असा विश्वास नागे यांनी व्यक्त केला.
पुनावळे, चिंचवडमध्ये दणदणीत पदयात्रा –
राहुल कलाटे यांनी पुनावळे, चिंचवड भागातून पदयात्रा व प्रचारफेरी काढली. सर्वपक्षीय नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीमध्ये सहभागी झाले होते. पुनावळेतून रॅलीला सुरूवात झाली. भुजबळवस्ती, ढवळे नगर, विजय नगर, कोयते वस्ती, चिंचवडगाव या भागातून काढण्यात आलेल्या फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काळेवाडी येथील मस्जिदीस भेट देत मुस्लिम समाज बांधवांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
खान्देशवासीयांचा कलाटेंना पाठिंबा – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांना खान्देशी बांधवांनी विनाशर्त जाहीर पाठिंबा दिला असून कलाटे यांना विजयी करून एकनाथ खडसे यांच्यावर भाजपाने केलेल्या अन्यायाचे उट्टे काढण्याचा चंग या रहिवाशांनी बांधला आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात खान्देशी समाज बांधव, लेवा मराठा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारीमध्ये डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना चिंचवड विधानसभा मतदार संघातील खान्देशवासियांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीविरोधातील उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांना खान्देशी बांधवांनी विनाशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे कलाटे यांचे पारडे जड झाले आहे.