पुणे : निवडणुका आल्या की घराणेशाही या शब्दाला फार जोर येतो. पण यंदा राजकीय घराण्यातील 50 चेहऱ्यांना या विधानसभेत मतदारांनी संधी दिली आहे. त्यात पवार कुटुंबीय आघाडीवर आहेत. या कुटुंबातील चार जण वेगवेगळ्या विधी मंडळाच्या सभागृहात आहेत.
यंदाच्या निवडणुकीत प्रचाराचा मोठा भार वहात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सन्मानजनक स्थिती मिळवून देणारे 79 वर्षीय शरद पवार हे राज्यसभा सदस्य आहेत. त्यांनी कन्या सुप्रिया सुळे लोकसभा सदस्य आहेत. त्यांचे पुतणे अजित पवार हे सातव्यांदा विक्रमी मतांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा पुतण्या रोहीत कर्जत जामखेडमध्ये मंत्री राम शिंदे यांना धुळ चारून विधानसभेत पोहोचले. त्यांचे आणखी एक जवळचे नातेवाईक राणा जगजितसिंह पाटील हे तुळजापूर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारीवर विजयी झाले आहेत.
या 50 पैकी 25 कुटुंब कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या परिवारातील आहेत. तर भाजपाच्या परिवारात 20 कुटुंबांना स्थान आहे. चार कुटुंबांना शिवसेनेचा आश्रय आहे. स्व. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही पूत्र लातूरमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. मोठा मुलगा अमित सलग तिसऱ्यांदा लातूरमधून विजयी झाला तर धाकटा धीरज प्रथमच लातूर ग्रामीण मधून विजयी झाला आहे. देशमुख बंधूंप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातून बबनराव आणि संजय शिंदे राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेत पोहोचले आहेत. बबनराव शिंदे माढ्यातून तर संजय करमाळ्यातून विजयी झाले. ही त्यांची आमदार होण्याची तिसरी वेळ होती. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे हे बबनराव यांचे जावई.
या बंधूंप्रमाणेच बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे विरारमधून तर त्यांचे चिरंजीव क्षीतिज नालासोपाऱ्यातून विधानसभेत पाऊल टाकतील. माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण हे भोकर या पारंपरिक मतदारसंघातून विजयी झाले आहेत.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधून विजयी झाले आहेत. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणीती तिसऱ्यांदा सोलापूर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. जर त्यांच्याकडे गुणवत्त असेल, तर तरुणांनी राजकारणात येण्यात गैर काही नाही. हे काही लादलेले नसतात. त्यांच्या गुणवत्तेवर ते विजयी होतात. तरूणअंणी राजकारणातील सहभाग वाढवायला हवा, असे समर्थन नारायण राणे यांनी केले. त्यांचे पुत्र कणकवलीतून विजयी झाले आहेत.
सुनील तटकरे यांची कन्या आदिती या श्रीवर्धनमधून निवडून आल्या तर केंद्रीय राज्य मंत्री संजय धोत्रे यांचे भाचे रणधीर सावरकर यांनी अकोले येथून गुलाल उधळला. भाजपाचे माजी मंत्री सुनिल कांबळे यांचे बंधी सुनील पुणे कॅंटोन्मेंटमधून विजयी झाले. माजी मंत्री सतेज पाटील यांचे पुतणे रुतुराज हे कोल्हापूर दक्षिणमधून जिंकले. तर शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश दापोलीतून विधानसभेत गेले. भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष भोकरदनमधून विजयी झाले. खासदार सुजय विखे यांचे पिता राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीतून विजयी झाले.