बोगस ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या नागरिक सहज जाळ्यात
पुणे – ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नागरिकही सहज या कंपन्यांच्या ऑफरवर विश्वास ठेऊन ऑनलाइन व्यवहार करतात. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय रहात नाही. दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अशा कंपन्यांचे पेव फूटते. विविध आकर्षक ऑफर व स्वस्त ट्रिपचे आमिष दाखवत नागरिकांना जाळ्यात अडकवले जाते. सायबर क्राईमसेलकडे 2017 मध्ये 35 आणि 2018 पर्यंत 18 गुन्हे दाखल झाले आहेत.
अशा ट्रॅव्हल्स कंपन्या अनेकदा ऑनलाइन राहणाऱ्या नागरिकांना जाळ्यात अडकवत असतात. ज्या व्यक्ती फेसबुक, गुगल आदी माध्यमांतून ऑनलाइन पर्यटनस्थळांची माहिती तसेच तिकीटांची माहिती घेत असतात, त्यांचा मोबाइल क्रमांक किंवा फेसबुक अकाऊंटची माहिती अनेकदा ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या या कंपन्या मिळवतात. यानंतर त्यांना वेळोवेळी देशी आणि विदेशी पर्यटनस्थळांच्या सवलतींचे आमिष दाखवले जाते. स्वस्तात परदेश सफर घडत आहे, तसेच पैशांचीही बचत होत आहे हे पाहुन अनेकजण जाळ्यात अडकतात.
ऑनलाइन पैसे भरताना नागरिक जरासाही विचार करताना दिसत नाहीत. या कंपन्या त्यांच्या साईटवर रेटींगही खोटे दाखवतात. प्रत्यक्षात त्यांचे कोणतेही कार्यालय नसते किंवा वेबसाईटही ओरिजनल नसते. या कंपन्या वेगवेगळ्या वयोगटांतील नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवताना दिसतात. ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन कमी पैशांत करून आणण्याचे तसेच विमान तिकीटात सवलत देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. ग्रुप बुकिंगला सवलत देऊ केली जाते. मात्र, बुकींग केल्यावर संबंधित कंपनीचा फोन बंद होतो. तसेच, अनेकदा वेबसाईटही बंद केली जाते.
तक्रारींची संख्या वाढतेय
ऑनलाइन माध्यमातून टुर्स, हॉलिडे पॅकेज बुक केल्यानंतर नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणी 2017 मध्ये पुणे शहर सायबर सेलकडे 35 ते 36 तक्रार अर्ज आले होते. ऑक्टोबर 2018 पर्यंत 18 तक्रारींची नोंद झाली असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
नागरिकांनी ऑनलाइन टूर बुक करताना संबंधित कंपनीचे कार्यालय शहरात आहे का? याची चाचपणी करावी. कार्यालय शहरात असेल तर प्रत्यक्षात भेट देऊन माहिती घ्यावी. यासोबत कंपनी जर इतर कंपन्यांच्या तुलनेत जास्त सवलत देत असेल तर, थोडी खबरदारी घ्यावी. इतरही एक ते दोन ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून पॅकेजची माहिती घेऊन टूर बुक करावी. कंपनीची विश्वसार्हता किती आहे हे पहावे.
– जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम