सध्या प्रसिद्धी मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणून टीकास्र सोडणे याकडे पाहिले जात आहे. कुणीही उठावं आणि कुणावरही टीका करावी असा एक प्रवाहच सध्या रुढ होताना दिसत आहे. स्तुती केल्यानंतरही जितकी प्रसिद्धी मिळत नाही तितकी टीका केल्यानंतर मिळते हे एव्हाना स्पष्ट झालंय.
त्यामुळंच की काय, बॉलीवूडमधील अनेक जण या टीकास्राचा आश्रय घेताना दिसतात. विशेषतः, नव्यानं सिनेसृष्टीत येऊ पाहणारे किंवा काही कारणास्तव बाजूला फेकले गेलेले लोक हा पर्याय अवलंबताना दिसतात. पण त्यामुळे ज्याच्यावर टीका होते त्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
आता हेच पहा ना, अभिनेत्री कंगना राणावतची बहीण रंगोली चंदेल हिने अभिनेता रणवीर सिंहवर उगाचच हल्लाबोल चढवला आहे. बॉलीवूडमधील नेपोटिस्म किंवा घराणेशाहीच्या नावावर रंगोलीने रणवीरच्या श्रीमंतीबाबतही काही ट्विट केले आहेत.
सोशल मीडियावर एका युजरने शेअर केलेला फोटोही तिने रिट्विट केला आहे. या फोटोमध्ये सोनम कपूर, रणबीर कपूर यांच्यासोबत रणवीर सिंह दिसून येत आहे. वास्तविक हा फोटो खूप जुना आहे आणि तिघेही लहान वयात असतानाचा आहे. रंगोलीने त्यावर लिहिले आहे की, ज्यांचे आई-वडील श्रीमंत असतात त्यांना संधी अनेक असतात. त्यांच्या ओळखी अफाट असतात.
तसेच ज्या व्यक्ती बाहेरुन आलेल्या नसतात, गावाहून आलेल्या असतात, ज्यांना नीट इंग्रजी बोलता येत नाही, लहानसहान शाळांमध्ये शिकलेल्या असतात, ज्यांकडे फॅन्सी कपडे नसतात त्यांच्याशी चांगले वर्तन केले जात नाही. रंगोली पुढे उपहासाने लिहिते की, फोटोतील हे तिघेही अत्यंत टॅलेंटेड आहेत आणि त्यांना अटेन्शन व आपल्या दयेची गरज आहे. चला आपण वंचितांना शक्ती देऊया’. साहजिकच या ट्विटनंतर रणवीर भडकला नसेल तरच नवल !