शशांक खेतान दिग्दर्शन करणार असलेल्या “मिस्टर लेले’ या आगामी सिनेमात वरुण धवन लीड रोल करणार असल्याची घोषणा वर्षभरापूर्वी झाली होती, वरुण धवनचा फर्स्ट लूक देखील रिलीज करण्यात आला होता.
मात्र आता वरुणने या सिनेमातून माघार घेतली आहे. त्याला या सिनेमाची कथा आवडली नव्हती. त्याने कथेमध्ये थोडा बदल सुचवला होता, असे समजते आहे. मात्र, त्याने सुचवलेल्या कथेवर काम करण्यापूर्वीच करोनाचे संकट आले. वर्षभराच्या कालावधीत लॉकडाऊनमुळे सिनेमाचे प्रोडक्शन थांबले होते. आता निर्मात्यांनी पुन्हा सिनेमाचे काम सुरू करायचे ठरवले आहे. शशांक खेतान यांनी नव्याने स्क्रीप्ट तयार केली आहे आणि वरुणच्या जागेवर विकी कौशलला घेतले आहे.
विकी कौशलला या सिनेमाची मूळकथा आवडली आणि त्याने लगेच गुप्तहेराच्या या रोलला होकार दिला आहे, असे समजले आहे. वरुण धवनने आतापर्यंत ऍक्शन हिरोचा रोल केलेला नव्हता. त्याला ही संधी मिळाली होती. पण आता त्याने त्या रोलसाठी नकार दिला आहे. विकी कौशलसाठी “उरी-सर्जिकल स्ट्राईक’ च्या निमित्ताने ही दुसरी संधी आहे. “मिस्टर लेले’ मध्ये जान्हवी कपूर आणि भुमी पेडणेकर हे देखील असणार आहेत.