कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे औरंगाबाद विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश कुलपती कार्यालयाकडून त्यांना आज प्राप्त झाला आहे. ते उद्या (दि. 4 जून) कार्यभार स्वीकारणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे तिसरे विद्यापीठ आहे. यापूर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या दोन विद्यापीठांच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभारही सांभाळला आहे. औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने पुढील आदेश होईपर्यंत डॉ. शिंदे यांच्याकडे तेथील प्रभारी कार्यभार असणार आहे.

या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ज्या मातृसंस्थेत मी शिकलो, जिथे वाढलो, जिच्या बळावर कुलगुरू पदापर्यंत मजल मारू शकलो, त्या मातृसंस्थेच्या कुलगुरूपदी काम करण्याची संधी कुलपती सी. विद्यासागर राव यांनी दिली आहे. हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. ही संधी मिळण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मोलाचा वाटा आहे, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.