राजगुरूनगर (प्रतिनिधी) -आसखेड (ता. खेड) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक समस्या असून येथील डॉक्टर वेळेत कामावर हजर राहत नसून, या ठिकाणी बोगस डॉक्टर म्हणून एक व्यक्ती राहत आहे. डॉक्टर म्हणून पशुधनावर उपचार करीत आहे. अत्याधुनिक सेवा सुविधा असलेल्या येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, सोमवारी (दि. 23) खेड तालुका पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी आसखेड पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. त्यावेळी या दवाखान्यातील हा सर्व प्रकार उघड झाला. त्याबाबत रविवारी (दि. 29) त्यांनी ही माहिती दिली. या दवाखान्यातील नियुक्तीवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. टी. दिवटे हे कोणतीही सूचना न देता गैरहजर होते. तर दवाखान्यात मद्यधुंद व्यक्ती डॉ. पांडुरंग पवार दवाखाना चालवत असल्याचे समोर आले.
ते राहत असलेल्या येथील दवाखान्यातील खोलीची पाहणी केली असता तेथे दारूच्या बाटल्या सापडल्या. अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांशी याबाबत चर्चा केली असता येथील डॉ. दिवटे हे दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून येत नसल्याचे सांगितले. अजून धक्कादायक बाब म्हणजे दवाखान्यात डॉ. पांडुरंग पवार हे पशुधनावर उपचार करीत असल्याची बाब समोर आल्यानंतर अधिकारी व पदाधिकारी अवाक झाले.
डॉ. दिवटे यांना आपल्या नोकरीचे भान नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्या जागी गरजू अधिकाऱ्याला संधी दिली जाईल. पशुधनाची काळजी घेण्यासाठी डॉ. दिवटे यांचा बडतर्फ करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन काळात कोणी कामचुकारपणा केला तर त्यांचे खैर केली जाणार नाही.
– अंकुश राक्षे, सभापती, पंचायत समिती