पशुवैद्यकीय दवाखाने आता “ऑनलाइन’

“महावेट नेट’ या प्रकल्पांतर्गत जोडणार : एका “क्‍लिक’वर माहिती होणार उपलब्ध

पुणे – जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने आता “ऑनलाइन’ असणार आहेत. “महावेट नेट’ या प्रकल्पांतर्गत हे दवाखाने जोडले जाणार असून या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधा, दैनंदिन कामकाजाच्या सर्व नोंदी “ऑनलाइन’ पद्धतीने नोंदविल्या जाणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू असून लवकरच पशुवैद्यकीय दवाखान्यांची माहिती एका “क्‍लिक’वर उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील 228 प्रथम आणि द्वितीय श्रेणी दवाखान्यांतून पशुवैद्यक सहाय्यकांमार्फत पशुपालकांना सेवा देण्यात येतात. शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन वैद्यकीय सेवा, सुविधा देण्याबरोबरच या पशुवैद्यकांना 19 प्रकारची नोंदणी पुस्तिका (रजिस्टर) हाताने लिहाव्या लागतात. दवाखान्यात आलेल्या जनावरांचे केसपेपरही तयार करावे लागतात. सर्व कामे आता ऑनलाइन होणार आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुगणनेच्या वेळी देण्यात आलेले टॅब आणि इंटरनेट जोडणी देण्यात येणार आहे.

दरम्यान, अद्यापही सर्व दवाखान्यांना टॅब वाटप, तसेच नेट जोडणी दिलेली नाही. पशुवैद्यक सहाय्यक शेतकऱ्याच्या गोठ्यावर भेटी देतात. अशावेळी उपचाराचे साहित्य आणि टॅबची ने आण करणे जिकरीचे ठरणार आहे. जनावरांचा टॅग नंबर, पशुपालक मोबाइल नंबर व इतर नोंद करावी लागत असल्याने हे काम वेळखाऊ आणि किचकट आहे. त्यामुळे माहिती भरायची कधी आणि पशुचिकित्सा करायची कधी, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट जोडणीत असलेल्या अडचणी, त्यामुळे ऑनलाइन नोंदणी घेताना अडचणी येतात, आदी समस्यांचा संघटनेच्या स्तरावरही आढावा घेतला जात असून अडचणी दूर झाल्यानंतर सर्व दवाखान्यांचे कामकाज “ऑनलाइन’ करण्यात येणार आहे.

नोंदणीमुळे होणार फायदा
ऑनलाइन नोंदणीमुळे बोगस आकडेवारी, खोट्या नोंदणी राहणार नाही. शेतकऱ्यांनाही ही माहिती सहज उपलब्ध होणार आहे. शिवाय पशूधनाला मिळालेल्या वैद्यकीय सेवा आणि सुविधांविषयी दर तीन महिन्याला मेसेजही मिळणार आहे. संगणकीय प्रणालीमध्ये पशुपालकाचे नाव, गाव, जनावरांची माहिती, दिनांक, केलेली तपासणी, वासराचा जन्म, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतन, या सेवा सुविधांची नोंद “ऑनलाइन’ घेतली जाणार आहे. या माहितीच्या आधारे एका क्‍लिकवर केस पेपरही तयार होणार आहे.

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे कामकाज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. प्रायोगिक तत्त्वावर काम करत असताना, त्यात येणाऱ्या अडचणींचाही अभ्यास केला जात आहे. या समस्यांवर मार्ग काढून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे कामकाज “ऑनलाइन’ केले जाईल.
– शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.