महात्मा गांधी पुण्यतिथी : पंतप्रधानांसह दिग्गजांनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली : अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. दरम्यान, महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी राजघाटावर येऊन महात्मा गांधींना श्रध्दांजली वाहिली.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजघाटावर त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांना श्रध्दांजली वाहिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाण्यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ट्विट केले. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘पूज्य बापूंचे व्यक्तिमत्व, विचार आणि आदर्श आपल्याला सशक्त, सक्षम आणि समृद्ध नवा भारत बनविण्यासाठी प्रेरणा देत राहतील.’


कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर त्यांनी असे म्हटले आहे की, ‘बापू तुम जिंदा हो, खेतों में खलिहानों में, न्याय, सत्य और प्रेम के अरमानों में’

30 जानेवारी 1948 साली महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना सभेला जात असताना महात्मा गांधी यांच्यावर नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या होत्या. महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशातील अनेक भागांमध्ये नारिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. जामिया विद्यापीठाचे विद्यार्थी राजघाटापर्यंत मोर्चा काढणार आहे. दिल्लीमध्ये पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.