शिर्डी – तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई सातारकर यांचे संगमनेरमध्ये करोनामुळे निधन झाले होते दरम्यान, रघुवीर खेडकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. कांताबाई सातारकर यांच्या कन्या आणि नातवाचेही निधन झाले. मुलगी अनिता उर्फ बेबीताई आणि नातू अभिजित उर्फ बबलू यांचं करोनामुळे निधन झाले. जवळपास 15 दिवसांच्या कालावधीत कुटुंबातील तिघा जणांच्या मृत्यूने खेडकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
खेडकर कुटुंबियांना गेल्या काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. करोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अनिता यांचे संगमनेरमध्ये तर अभिजित याचे नाशिकमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.
कांताबाई सातारकर यांनी लोप पावत चाललेल्या कलेला जिवंत ठेवण्यासाठी दर्जेदार तमाशाचे कार्यक्रम केले. आपल्या कलेमधून तमाशा रसिकांची मने जिंकली. त्यांच्या निधनामुळे तमाशा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखामध्ये राज्यातील सर्व तमाशा फडमालक कलावंत, नारायणगावच्या ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र शासनाने सन 2005 मध्ये तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. तसेच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला.