सातारा : सातारा जिल्ह्यातील अपशिंगे गावचे सुपूत्र सुधीर सूर्यकांत निकम यांचे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी निधन झाले. त्यामुळे अपशिंगे गावावर शोककळा पसरली. सुधीर निकम यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुधीर निकम हे गुजरातमधील जामनगर येथे सेवा बजावत होते. त्यांना शारीरिक त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेत असताना त्यांची प्रकृती खालवली. त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
8 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असणाऱ्या वीर जवान सुधीर निकम यांच्यावर आज सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या गाडीतून अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली. विजय स्तंभ येथे मिलिटरी परेड होऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सातारा पोलिसांच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.