मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन झाले आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.
८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे.
प्रेमा किरण यांनी उतावळा नवरा, थरकाप या चित्रपटांची निर्मितीदेखील केली होती. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा आली आहे.