मुंबई – बॉलिवूड पुन्हा एकदा शोकसागरात बुडाला असून चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. 115 चित्रपटांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून आजाराशी झूंज देत असलेल्या या अभिनेत्रीचे आज निधन झाले.
कुमकुम यांनी प्रसिद्ध अभिनेते गुरु दत्त आणि किशोर कुमार यांच्याबरोबर काम केले होते. मदर इंडिया, कोहिनूर, उजाला, एक सपेरा एक लुटैरा यासारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
बिहारमधील शेखपुरा (आताचे) येथे 22 एप्रिल 1934 रोजी कुमकुम यांचा जन्म झाला होता. त्यांचे मुळ नाव जेबुनिस्सा होते. त्यांचे वडील हुसैनाबादचे नवाब होते. कुमकुम यांना गुरुदत्त यांनी शोधले, असे म्हटले जाते.
गुरुदत्त यांनी त्यांचा आर पार (1954) चित्रपटामधील गाणं “कभी आर कभी पार लागा तीरे नजर’चे शूटिंग अभिनेता जगदीप यांना घेऊन करायचे होते. त्यांना नंतर वाटले की कोणत्यातरी स्त्री पात्राला घेऊन हे गाणे चित्रित व्हायला हवे. तेव्हा गुरुदत्त यांनी कुमकुम यांना घेऊन या गाण्याचे शूटिंग केले होते.
मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या त्यांच्या बंगल्याचे नाव देखील “कुमकुम’ असे होते. कालांतराने याठिकाणी हा बंगला तोडून इमारत उभारण्यात आली होती. दरम्यान, चित्रपटसृष्टीतून त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करण्यात येत आहे.