सातारा (प्रतिनिधी) – ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय ७९) यांचे आज पहाटे चार वाजता कोविड न्यूमोनियामुळे निधन झाले.
साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अतिदक्षता विभागात त्या पाच दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या, परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली. गेले 5 दिवस आणि मृत्यूसमयी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल या त्यांच्यासोबत होत्या.
एका वाहिनीवर काळूबाई मालिका सुरु आहे. या मालिकेचे चित्रिकरण जिल्ह्यात सुरु होते. चित्रिकरणादरम्यान मुंबईतील काही नर्तक कलाकार एक दिवस सहभागी झाले होते. त्यावेळी मालिकेतील काही कलाकारांना करोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आशालता यांचाही समावेश होता. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते. आशालता यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या.