पुणे – गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती “जैसे थे’ असून, ते उपचाराला फारसा प्रतिसाद देत नसल्याचे गोखले कुटुंबीयांचे स्नेही राजेश दामले यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत नाही; परंतु डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. असे दामले यांनी सांगितले.
गोखले यांचे “मल्टिपल ऑर्गन फेल्युअर’ झाले आहे. त्यांचे अवयव हळूहळू निकामी होत आहेत. बुधवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. बुधवारी दुपारपासून ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. मात्र डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्याला यश येईलच, अशी अपेक्षा दामले यांनी व्यक्त केली.
गोखलेंवर उपचार करणारे डॉक्टर आणि गोखले कुटुंबीय यांच्यात बुधवारी सकाळी चर्चा झाली. गोखलेंची परिस्थिती गंभीर असून, ते व्हेंटिलेटरवर आहेत. शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स दिले जातील, असे दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकरी शिरीश याडगीकर यांनी सांगितले.
अफवा पसरवू नका
बुधवारी संध्याकाळपासूनच गोखले यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात असे काही अवचित घडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी कोणत्याच अफवा पसरवू नका आणि त्यावर विश्वास ठेवू नका, अशी विनंतीही गोखले यांचे कुटुंबीय आणि स्नेहीजनांनी केली आहे.