Vijay Kadam Passed Away । ८० च्या दशकात छोट्या मोठ्या विनोदी भूमिका साकारत अभिनय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या विजय दत्ताराम कदम (वय 67) यांचे आज (१० ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
मराठी रंगभूमीला व चित्रपट सृष्टीला आपल्या सहजसुंदर अभिनयाने समृध्द करणारे अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे. रंगभूमीवरचा सहज वावर, भूमिकेला न्याय देण्याची भावना व कलेप्रती श्रद्धा बाळगणाऱ्या काही मोजक्याच अभिनेत्यांमध्ये विजय कदम यांचा समावेश होतो. मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका अगदी लीलया पार पडणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणून मराठी कलाक्षेत्रात ते सदैव आठवणीत राहतील. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ अशा सुप्रसिद्ध नाटकांतून अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांचे शरद तळवलकर, राजा गोसावींसारखे ज्येष्ठ विनोदी नट आदर्श होते.
त्यांनी लहान असताना ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बालनाटकात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर आंतरशालेय वैयक्तिक अभिनय व एकांकिका स्पर्धेत सहभाग घेतला होता. कलावंत म्हणून विजय कदम यांची जडणघडण झाली ती डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये. या शाळेतील तळाशीलकर, सावंत महाजन आणि परब सर यांचे मार्गदर्शन कदम यांना मिळाले. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. ‘तत्वज्ञान’ हा विषय घेऊन त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत त्यांना व्यावसायिक दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
‘अपराध कुणाचा’ हे कदम यांचे पहिले व्यावसायिक कुमार नाटक. पुढे ‘स्वप्न गाणे संपले’ या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी साटम अशा प्रतिथयश कलावंतांसोबत काम करून त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले. ‘खंडोबाचं लगीन’ या जागरण विधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणचा ‘सर्वोत्कृष्ट लोकनाटय अभिनेता’ हा पुरस्कार मिळवून दिला. रथचक्र, घरटे आमुचे छान, वासुदेव सांगती, अशी व्यावसायिक नाटके करता करता टूरटूर या नाटकाने त्यांना खरी लोकमान्यता मिळाली, तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याने राजमान्यता बहाल केली. विजय कदम गेली काही वर्षं सातत्याने ‘विच्छा माझी पुरी करा’ चे प्रयोग करत असत. या लोकनाट्याचे १९८६ पासून विजय कदम यांनी विच्छाचे ७५० पेक्षा जास्त प्रयोग केले.
त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून खुमखुमी हा लोकप्रिय एकपात्री प्रयोग साकारला. अनेक वर्षे त्यांच्या ‘विजयश्री’ या संस्थेतर्फे ‘खुमखुमी’चा अडीच तासाचा कार्यक्रम सादर करत होते. याच खुमखुमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक संस्था, तसेच गरजू अपंगांना मदतीचा हात दिला.
देखणी बायको नाम्याची, मेनका उर्वशी, कोकणस्थ, राजानं वाजवला बाजा, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लावू का लाथ, गोळाबेरीज, वासुदेव बळवंत फडके, रेवती हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. त्यांनी हळद रुसली कुंकू हसली या चित्रपटात अश्विनी भावेच्या पतीची भूमिका साकारली होती. विच्छा माझी पुरी करा, टुरटूर, पप्पा सांगा कुणाचे, सही रे सही, खुमखुमी ही देखील त्यांची गाजलेली नाटके. कदम यांनी गोट्या, पार्टनर, घडलंय बिघडलंय, दामिनी, सोंगाड्या बाज्या, इंद्रधनुष्य, घडलयं, ती परत आलीय अशा अनेक मराठी, तसेच मिसेस माधुरी दीक्षित, अफलातून, श्रीमान श्रीमती, एक मंदिर या हिंदी मालिकेतही अभिनय केला. विजय कदम यांनी अनेक गाजलेल्या जाहिरातीत अभिनय केला होता. विजय कदम यांच्या पत्नी पद्मश्री जोशी यादेखील अभिनेत्री असून, पल्लवी जोशी आणि मास्टर अलंकार यांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. नाटकात काम करताना विजय यांची पद्मश्री यांच्याशी ओळख झाली.
नणंद भावजय चित्रपटात पदमश्री यांनी नणंदबाईंची भूमिका साकारली आहे. ‘चंपा चमेली की जाई अबोली ‘ हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं विशेष गाजले होते. पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा हे पद्मश्री यांचे इतर चित्रपट. विजय कदम यांचा मुलगा गंधार कदम हा एक गायक असून, त्याने पोश्टर बॉईज आणि इतर काही चित्रपटांत गाणी गायली आहेत. विजय कदम यांची विजयश्री नाट्यसंस्था असून, गेली अनेक वर्षे त्या माध्यमातून ते अनेक नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरासह दुबई, सिंगापूर, दोहा आदी ठिकाणी यशस्वीपणे करत असत.
झी मराठीवरील ती परत आलीये या मालिकेच्या माध्यमातून विजय कदम यांनी अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर मालिकेत दमदार पुनरागमन केले होते. त्यांना दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र दिनानिमित्त youtube वर ‘कदमखोल’ ही नवीन मालिका सुरू केली होती. कदम यांचे हलकं फुलक हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. ते गेल्या दीड वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या चार केमिओथेरपी व दोन सर्जरी झाल्यानंतर नुकतीच कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली होती. या हरहुन्नरी अभिनेत्याच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टीत पोकळी निर्माण झाली असून, सर्वजण शोक व्यक्त करत आहेत.