मुंबई : मराठी तसेच हिंदी चित्रपटक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे आज निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
वयाच्या 75 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुनील शेंडे मागील काही दिवसांपासून आजारी होते. रात्री उशिरा त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती सुनील शेंडे, दोन मुलं ऋषिकेश शेंडे आणि ओमकार शेंडे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सुनील शेंडे राहत्या घरी चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. विलेपार्ले येथील राहत्या घरीच रात्री एक वाजता त्यांचे निधन झाले आहे. आज सुनील शेंडे यांच्या पार्थिवावर पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जातील.
सुनील शेंडे हे रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील नावाजलेले अभिनेते होते. दोन दशकांच्या कालावधीत त्यांनी विविध बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. या सोबतच अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय त्यांनी विविध नाटकांमध्ये देखील काम केले होते. तसेच ‘सरफरोश’, ‘गांधी’, ‘वास्तव’ अशा अनेक सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या.