मुंबई : देशात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून करोनाची प्रकरणे दररोज झपाट्याने समोर येत आहेत. आता बॉलिवूडमध्येही त्याचा कहर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली आहे.
नुकतीच एकता कपूर, जॉन अब्राहम, प्रिया रुंचाल, डेलनाज इराणी यांनाही करोना झाल्याची बातमी समोर आली होती, त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांनाही करोनाची लागण झाली आहे.
प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे.
डॉ जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८६ वर्षीय प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती बरी असून एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे.