मुंबई – ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांनी बादशाह, खिलाडी या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रंगभुमीवरही त्यांनी बरीच वर्षे सेवा केली आहे.चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिका खूप गाजल्या. त्यांना कलाक्षेत्रातील योगदनाबद्दल याच वर्षी पद्मश्री पुरस्कार देऊन सरकारने गौरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या कलेद्वारे असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवले असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
दिनयार कॉन्ट्रॅक्टर हे एक उत्तम कलाकार होते असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या शोक संदेशात नमूद केले आहे. त्यांचे रंगभूमीवरील योगदानही संस्मरणीय आहे असेही स्मृती इराणी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
रंगभूमी व चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास पाच दशके रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते व विनोदवीर दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांच्या निधनाने अभियनाच्या क्षेत्रातील एक अनोखा तारा निखळला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, हिंदी तसेच मुख्यत्वे गुजराती भाषेतील दूरचित्रवाणीवरील विविध मालिका, चित्रपटांतून आपल्या अभिनयाने खास करुन विनोदी भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. त्याहून अधिक रंगभूमीवरचा एक दमदार अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक नाटकांतील त्यांचा अभिनय गाजला होता. त्यांच्या अगदी छोट्या-छोट्या भूमिकादेखील रसिकांच्या स्मरणात आहेत. अभिनयासोबत लेखक व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले होते. जवळपास पाच दशके रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताला यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.