कामशेत-पवनानगर रस्त्यालगत ‘वेस्टेज स्पॉट’

परिसरात दुर्गंधी : शिल्लक अन्न टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी

कामशेत – कामशेत-पवनानगर रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मांस विक्रीच्या दुकानातील “वेस्टेज, हॉटेलमधील शिल्लक अन्न व कचऱ्याच्या पिशव्या टाकल्या जात आहेत. “वेस्टेज’मुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

पावसाळ्यात कामशेत पवनानगर रस्त्याने मोठ्या प्रमाणत पर्यटकांची वर्दळ असते. या रस्त्या लगतच्या डोंगर व धबधबे व हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात छायाचित्र काढण्यसाठी पर्यटक थांबत असतात. पण या रस्त्यालगत टाकल्या जाणाऱ्या हॉटेल्स आणि मांस विक्रीच्या दुकानातील “वेस्टेज’ आणि कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

याशिवाय या पिशव्यांमधील अन्न शोधण्यासाठी परिसरातील मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणात या कचऱ्यावर येतात. मोकाट कुत्र्यांच्या भीतीमुळे पर्यटक येथे थांबण्यास टाळत आहेत. शिल्लक अन्न खाण्यासाठी आलेली कुत्री अचानकपणे रस्त्यावर येत असल्याने अनेक अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात पसरणारी दुर्गंधी टाळण्यासाठी कामशेत-पवनानगर रस्त्यालगत व रस्त्यावरील बौर खिंडीत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मात्र रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणार का ? प्रश्‍न नागरिकांमध्ये उपस्थित केला जातो आहे. हे कचरा व “वेस्टेज’ पोत्यांमध्ये भरून रात्री उशिरा टाकले जात असल्याने ते लोकांच्या निदर्शनास देखील येत नाहीत.

यामुळे पवनानगर रस्ता, कामशेत व परिसरातील मांस विक्री करणारे दुकानदार व हॉटेल व्यावसायिक हे आपले “वेस्टेज’ कुठे टाकतात याची माहिती स्थानिक प्रशासनाने घेऊन त्यांच्यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी पर्यटक, नागरिक, स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)