“कुकडी’त अत्यल्प पाणीसाठा

पाणी टंचाईचे ढग पुन्हा गडद 
दमदार पावसाची प्रतीक्षाच
गतवर्षीपेक्षा 21 टक्‍के साठा कमी

नारायणगाव – जुन्नर आणि आंबेगाव तालुक्‍यातील कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांच्या पाणलोटक्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली असून, या धरणांत 21.56 टक्‍के (6 हजार 584 दशलक्ष घनफूट) पाणीसाठा आल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी मागील वर्षी म्हणजे 2018 मध्ये पाचही धरणांत 43.33 टक्‍के पाणीसाठा होता.

गेल्या वर्षी 2018 ला राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी जुलैअखरे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्‍यांतील 5 धरणांमध्ये 83 टक्के पाणीसाठा होता. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्‍याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. प्रथमच वडज, येडगाव आणि डिंभे धरणातून मृत साठा काढण्यात आला होता, गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, यावर्षी जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला असला तरी गेल्या 7 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात उष्णता जाणवत आहे. मागील वर्षीच्या पावसाच्या प्रमाणात यंदाच्या चालू वर्षी पाऊस कमी झाला असल्याचे जाणवत आहे.

वडजमधून विसर्ग
जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस कोसळल्याने वडज धरणात 43.77 टक्‍के पाणीसाठा झाला असल्याने धरणातून मीना नदीला 71 क्‍युसेक वेगाने पाणी सुरू आहे.

21.56 टक्के उपयुक्त पाणीसाठा
जुन्नर तालुक्‍यातील येडगाव, वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगा आणि आंबेगाव तालुक्‍यातील डिंभा या सर्व धरणामध्ये एकूण 6584 दशलक्ष घनफुट पाणीसाठा असून, सर्व धरणात 21.56 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी जुलैच्या मध्यावर 13,233 दशलक्ष घनफुट म्हणजे 43.33 टक्‍के पाणीसाठा शिल्लक होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)