बिहारमध्ये राजकीय भुकंप; सहा पैकी पाच खासदारांचे चिराग पासवान यांच्या विरोधात बंड

पाटणा  – बिहार मधील लोकजनशक्‍ती पक्षात उभी फूट पडली असून पक्षाच्या सहा पैकी पाच लोकसभा सदस्यांनी पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या विरोधात बंड करून आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यांनी तसे पत्र लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना सादर केले आहे. आपल्या गटाला वेगळा पक्ष म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे पक्षात चिराग पासवान हे एकाकी पडले असल्याचे वृत्त आहे.

चिराग पासवान यांचे काका खासदार पशुपती कुमार पारस यांच्या नेतृत्वाखालीच हे बंड करण्यात आले असून त्यांनी आता चिराग पासवान हे आमच्या पक्षाचे नेते राहिलेले नाहीत असे म्हटले आहे.

लोकजनाक्‍ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे गेल्याच वर्षी निधन झाल्यानंतर पक्षाच्या प्रमुख पदी त्यांचे खासदार पुत्र चिराग पासवान यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. पण वर्षभरातच या पक्षात ही फूट पडली आहे. आज सकाळी या घटनेची कुणकुण लागल्यानंतर चिराग पासवान हे पशुपतीकुमार पारस यांच्या निवासस्थानी गेले परंतु पशुपतीकुमार यांनी त्यांना भेटण्यास नकार दिल्याने चिराग पासवान हे त्यांच्या निवासस्थानाबाहेर आपल्या गाडीतच बसून राहिले.

दरम्यान पशुपतीकुमार पारस यांनी पत्रकारांना सांगितले की, पक्ष वाचवण्यासाठीच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आमचा गट एनडीए आघाडी बरोबरच राहणार असून आम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याबरोबर राहणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. पारस हे बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदार संघातील खासदार आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना मंत्री म्हणून स्थान देण्याची ग्वाही मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली आहे असेही सांगण्यात येते. चिराग पासवान यांच्या कारवायांचा सूड घेण्यासाठीच नितीशकुमार यांनी ही फूट घडवून आणल्याचे मानले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.