अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्व

शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर सर्व आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात आपल्यातील बहुआयामी कौशल्यगुणांच्या जोरावर शिवसेना पक्षाला यशाच्या
सर्वोच्च शिखरावर नेऊन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर भगवा ध्वज डौलानं फडकविणारं तारांकित नेतृत्व म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे

शिवसेनाप्रमुखांची शिकवण सोबत घेऊन राजकीय व सामाजिक जीवनात सतत नवनवीन आव्हाने पेलत उद्धवजींनी प्रत्येकवेळी केवळ स्वत:ला सिद्धच केलं नाही तर राजकीय पटलावर आपलं स्थान ठळकपणे अधोरेखित केलं. उद्धवजींनी आपल्यातील अनोख्या कार्यशैलीचा सुयोग्य उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची उत्तमरित्या बांधणी केली. शिवसेनेचा आक्रमक बाणा कायम ठेऊन आपल्यातील संयमीपणा व समयसूचकता यांचा संगम साधून जनभावना जपण्याचं व लोकाभिमुख न्यायदानाचं काम चोख बजावत अतिशय कमी कालावधीतच उद्धवजी जनसामान्यांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत.

मी सन 2004 साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविली. तेव्हापासून आजपर्यंत उद्धवजी व माझ्यात आपुलकीचं व सौहार्दांच आगळ-वेगळं नातं प्रस्थापित आहे. आमच्या जाहीर सभांमधील भेटी असो वा मातोश्रीवरील वार्तालाप असो, उद्धवजी व माझ्यात नेहमीच सामाजिक, राजकीय परिस्थिती बरोबरच मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाची सकारात्मक चर्चा घडून येत असते. अनेकदा कौटुंबिक गप्पाही होतात. या प्रत्येक भेटीतून मला उर्जा प्राप्त होऊन अधिक काम करण्याची उर्मी निर्माण होते.

चांगल्या व्यक्‍तींचा सहवास नेहमीच सुखकर असतो असे म्हणतात. त्याचा प्रत्यय उद्धवजींसोबतच्या प्रत्येक भेटीतून मला येतो. मला आजही आठवतयं, माझ्या पहिल्या निवडणुकीवेळी मी उद्धवजींना भेटायला मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी मला खोकला झाला होता. हे समजताच उद्धवजींनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकास बोलावून औषधं मागवून घेतले व आपुलकीने काळजी घेण्याचा सल्लाही दिला.

उद्धवजींसोबत माझ्या अनेक व्यक्‍तिगत आठवणी जुळलेल्या आहेत. त्यातील काही आवर्जुन सांगाव्याशा वाटतात. माझ्या पहिल्या निवडणुकीआधी न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी येथे बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाच्या उद्‌घाटनास उद्धवजी ठाकरे व सुभाष देसाई आले होते. उद्‌घाटनावेळी फित कापताना निवडणुकीचा संदर्भ जोडून उद्धवजी मला म्हणाले, शिवाजीराव, स्विमींग पूलच उद्‌घाटन करतोय खरं, पण इथं मला गटांगळ्या खाताना पहायचं नाहीये. त्यांच्या या मिश्‍किल स्वभावावर सर्वच जण खदखदून हसले. उद्धवजींच्या मनात देशाभिमान प्रचंड आहे.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचं टपाल तिकीट प्रकाशित व्हावं यासाठी मी अनेक वर्ष संघर्ष करत होतो. त्यावेळी सांस्कृतिक खात्याचे केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी हुतात्मा राजगुरू यांच्यापेक्षा वहिदा रहमान व शंकरराव चव्हाण हे टपाल तिकिटासाठी जास्त योग्य वाटतात, अशा स्वरूपाचे उत्तर मला पाठविले होते. हे जेव्हा उद्धवजींना समजले तेव्हा त्यांनी अतिशय संताप व्यक्‍त केला. त्यांच्या जाहीर भाषणांतही त्यांनी यावर अनेकदा तीव्र आक्षेप नोंदवत संबंधित मंत्री महोदयांना खडे बोल सुनावले होते. सतत स्वत:ला कामात झोकून देणाऱ्या उद्धवजींना साधा एक ओळीचा एसएमएस केला तरी कामे आटोपल्यानंतर रात्री आवर्जुन मला फोन करून विचारपूस करतात, हा माझा नेहमीचा अनुभव आहे.

या भागातील पवित्र ज्योतिर्लिंग असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर व परिसराबद्दल त्यांना प्रचंड आपुलकी आहे. येथील मंदिर परिसर सुधारणा, घनदाट जंगल, औषधी वनस्पती, प्राणी इत्यादी बाबत ते अनेकदा माझ्याकडून माहिती घेतात. जुन्नर तालुक्‍यातील खिरेश्‍वर मंदिराबद्दल मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल आवर्जुन चौकशी करतात. मुळातच दुर्गप्रेमी असलेल्या उद्धवजींना माझ्या मतदार संघाला लागून असलेल्या हरिश्‍चंद्र गडाबद्दल, तेथे जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यांबद्दल माहिती जाणून घेण्यात कमालीचा आनंद असतो.

मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींनी महाराष्ट्र राज्याची धुरा आपल्या हाती घेतल्यावर करोनाचे संकट जगभर आ वासून उभे राहिले. या संकटकाळात अतिशय धैर्याने व संयमीपणे त्यांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवली. कोरोना संकटावर मात करण्यासाठी अहोरात्र व्यस्त असूनही मी पाठविलेल्या ई-मेल व व्हॉटस्‌ऍपवरील सूचनांची ते आवर्जून दखल घेतात. महत्त्वाच्या व गंभीर विषयात क्षणाचाही विलंब न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश बजावतात. एवढ्यावरच न थांबता स्वत:हून मला फोन करुन केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करतात. मुख्यमंत्री पदावर विराजमान असूनही ते आपले पाय जमिनीवर ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्‍न कसोशीने सोडवितात.

2019 लोकसभा निवडणुकीतील माझ्या परावभवाचा उद्धवजींना मोठा धक्‍का बसला. संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी मतांनी विजयी होणाऱ्या पहिल्या तीन खासदारांमध्ये मी आहे असा ठाम विश्‍वास त्यांना होता. मात्र निकाल विपरीत लागला. उद्धवजींनी मला मातोश्रीवर बोलावून पराभवाची कारणे समजून घेत एका अपयशाने खचून न जाता पुन्हा त्याच जोशानं कामाला लागा, पूर्वीसारखेच लोकांमध्ये रहा अशी आश्‍वासक थाप दिली. त्यांच्यातील विश्‍वासाने माझ्यातील अनुत्साह एका क्षणात गळून पडला. त्या दिवसापासून आजतागायत मी लोकांशी पूर्वी प्रमाणेच नाळ जोडून तन-मन झोकून जनतेची कामे निस्वार्थपणे करीत आहे. उद्धवजींचा माझ्यावरील विश्‍वास व आश्‍वासक बोल ही ऊर्जा मला कायम प्रेरणा देत राहील.

छे रिळप ुळींर्हीीें सरळप असं नेहमीच म्हटलं जात. कष्टाशिवाय फळ नाही हे तर सर्वांनी मान्यच केलं आहे. पण त्या कष्टांची मर्यादा किती असावी हे मात्र कोणीच ठरवत नाही. आज संपूर्ण जगात करोना या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. महाराष्ट्र राज्य सर्व जाती-धर्माच्या लोकांना सामावून घेऊन त्यांच्या राज्यांनी झिडकारले तरी स्विकारतो आहे अशा सर्वसमावेशक आणि सर्वधर्म समभाव निती जगणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे आणि त्या नेतृत्वाचे मला अप्रुप वाटते आणि या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व शिवसेना पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे करतायेत याचा सार्थ अभिमान आहे.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे आता काय होणार? या प्रश्‍नाचे सार्थ उत्तर म्हणजे उद्धव साहेबांचे नेतृत्व, धडाडीचे विचार अन निर्णय क्षमता. सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी सर्वांगाने अष्टपैलू असणारे व्यक्‍तिमत्त्व म्हणजे उद्धवजी ठाकरे. कठीण परिस्थितीत निर्णय घेण्याची आपली क्षमता ही तर वाखणण्याजोगीचं. साहेब आपले नेतृत्व आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना आपुलकी वाटावी अशी आपली विचारधारा आपल्या राजनैतिक विचारांच्या प्रेमात पाडते…आई तुळजाभवानी आपणांस उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना. आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
-शिवाजी आढळराव पाटील, मा.खासदार, शिवसेना उपनेते

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.