नगर (प्रतिनिधी) – ‘फ्रंटलाईन वर्कर्स’मध्ये समाविष्ट करत महापालिकेने शहरातील सर्वच दैनिकांच्या पत्रकारांचे लसीकरण केले. मात्र, त्याच वर्तमानपत्राचा प्रमुख घटक असलेले विक्रेते लसीकरणापासून वंचित होतेे. नागरीकांना थेट घरपोच वर्तमानपत्र पोचविणारा हा घटकही फ्रंटलाईनवरच काम करतो. तो देखील वर्तमानपत्रांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याची भावना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या विनंतीला मान देऊन महापालिकेतर्फे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या पुढाकाराने आज शहरातील वर्तमानपत्र विक्रेत्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, दैनिक प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे, अहमदनगर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गणेश गांधी, उपाध्यक्ष संजय गोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
महापौर वाकळे म्हणाले, ‘‘शहरातील लसीकरण वेगाने करण्यास महापालिका प्रशासन सज्ज आहे. आता येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा देखील सज्ज आहे. त्यासाठी आयुक्त शंकर गोरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्यासह सर्वांनाच सूचना दिल्या आहेत.
तथापि, सरकारकडून लसीकरणाचे डोस कमी येत असल्याचे थोडी अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठविणार असून, जास्तीत जास्त लसी मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.’’
दैनिक प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. वर्तमानपत्र घरोघरी पोचविणारा हा घटक सर्वच वर्तमानपत्रांचा आत्मा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांचेही लसीकरीण या अगोदरच व्हायला हवे होते, असे ते म्हणाले.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे अध्यक्ष गणेश गांधी यांनी प्रास्तविक केले. राज्य सरकाराने वृत्तपत्र विक्रेत्यांना लस घ्यावी, असे निर्देेश दिलेले आहेत. वृत्तपत्र विक्रेता हा बाराही महिने अखंडीत सेवा देणारा घटक आहे. त्यामुळे त्याचा फ्रंटलाईन वर्कर्स यादीत समावेश करण्यासाठी महापौर बाबसाहेब वाकळे व महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला, ही खूपच समाधानाची बाब असल्याची भावना अध्यक्ष गणेश गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.