जयपूर – व्हेलॉसिटीच्या संघाला विजयासाठी 2 धावांची गरज असताना ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजांनी दोन षटकांत पाच फलंदाजांना बाद करत सामन्यात रोमांच निर्माण केला मात्र, व्हेलॉसिटीच्या सुश्री प्रधानने दोन धावा काढत महिलांच्या आयपीएलमध्ये व्हेलॉसिटीसंघाला पहिला विजय मिळवून दिली.
प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्लेझर्सने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 112 धावांची मजल मारुन व्हेलॉसिटीसमोर विजयासाठी 113 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना व्हेलॉसिटीने हे आव्हान 18 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 113 धावा करुन पुर्ण करत सामना आपल्या खिशात घातला.
यावेळी 113 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या व्हेलॉसिटीची सलामीवीर शेफाली वर्माने आक्रमक सुरुवात करुन दिली. पॉवर प्लेमध्ये व्हिलॉसिटीने एका विकेटच्या मोबदल्यात 35 धावा केल्या होत्या. सलामीवीर हेली मॅथ्यु 5 धावांवर बाद झाल्यानंतर शेफालीने डॅनिएली वॅटसोबत दुसऱ्या विकेटसाठी 38 धावांची भागिदारी केली. मात्र, हरलीन देओलने 10 व्या षटकांत शेफालीला बाद करत व्हिलॉसिटीला दुसरा धक्का दिला.
शेफालीने 31 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारत 34 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे शेफाली ही या स्पर्धेत खेळणारी सर्वात कमी वयाची खेळाडू असुन तिचे वय केवळ 15 वर्षे इतके आहे. यानंतर डॅनिएली वॅटने आक्रमक खेळ करत व्हिलॉसिटीला 13 षटकांत 90 धावांपर्यंत पोहचवले.
तर, चौदाव्या षटकांत संघाला शंभरी ओलांडून दिली. यावेळी डॅनिएली वॅट आणि कर्णधार मिताली राज संघाला विजय मिळवून देणार असे वाटत असताना व्हेलॉसिटीच्या विजयास केवळ 2 धावांची गरज होती. मात्र, डॅनिएली 46 धावा करुन परतली तर पाठोपाठ मिताली देखील 17 धावा करुन परतल्याने 11 धावांवर दोन बाद वरुन व्हेलॉसिटीची 111 धावांवर चार बाद अशी परिस्थिती झाली होती. मिताली नंतर आलेल्या वेदा कृष्णमुर्ती, शिखा पांडे आणि एमेली केर एकही धाव न करता परतल्याने व्हेलॉसिटीची 2 बाद 111 वरुन 7 बाद 11 अशी अवस्था झाली होती. अखेर सुश्री प्रधानने दोन धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यावेळी ट्रेलब्लेझर्सच्या दिप्ती शर्माने 14 धावा देत 4 गडी बाद केले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या ट्रेलब्रेझर्सला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. सलामीवीर स्मृती मंधना केवळ 10 धावा करुन परतली. यानंतर आलेल्या हरलीन देओल (43) आणि दुसरी सलामीवीर सुझी बेट्स (26) यांनी चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. मात्र, या दोघी बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांच्या संघाची धावगती खालावली आणि त्यातच ठरावीक अंतराने गडी बाद होत असल्याने ट्रेलब्लेझर्सला केवळ 112 धावांचीच मजल मारता आली. यावेळी व्हिलॉसिटीकडून एकता बिश्त आणि एमेली केरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.