पावसाची दडी, शेतकऱ्यांची विस्कटली घडी

वेल्हे तालुक्यातील चित्र : लावणी खोळंबली

वेल्हे(प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्यात भात लागवडीला सुरूवात झाली असली तरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा चिंतेत पडला आहे. खाचरामध्ये पाणी नसल्याने भात लावणी करणे शक्य होत नाही. तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते. दरवर्षी शेतकरी आषाढी एकादशी पर्यंत आपल्या लावण्या आटोपून वारीला जाण्यासाठी रिकामा झालेला असतो. परंतू यंदा हे चित्र पाहायला मिळाले नाही. आषाढी एकादशी उलटून महिना दीड महिना व्हायला आला तरी लावण्या तशाच पडल्या आहेत. पावसाअभावी लावण्या खोळंबल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे.

करोनाच्या महाभयंकार महामारीत तालुक्यातील बाहेर गावी कामानिमित्त गेलेला तरूण गावाकडे येवून शेतीकडे वळाला. मात्र, वरूण राजाने दडी मारल्याने नव्याने शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंग होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे त्यांच्या स्वप्नांची घडी बसणार हे मात्र नक्की. जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वेल्हे तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी आकाश ढगांनी भरून राहतात मात्र दमदार पावसाची हजेरी लागली नाही. जून महिन्यात चक्री वादळाबरोबर पावसाने दमदार हजेरी लावली होती परंतू त्यानंतर पावसाने हळू हळू आपलं उग्र रूप कमी करत नेले ते आता दिसेनासे झाले आहे.

वेल्हे तालुक्यातील गुंजवणी, पानशेत, वरसगांव ही तीनही धरणे जुलै अखेर पर्यंत पुर्ण भरली जातात. मात्र ही धरणे अजूनही कोरडीच पडलेली आहेत. पाण्याची पातळी आर्ध्या पर्यंत सुद्धा आली नाही. पुणेकरांची तहान भागवणारी धरणे पुर्ण भरली नाहीत त्यामुळे पुणेकरांवर पाण्याचे संकट ओढावले जाईल. घाट धबधब्यांनी अखंड भरलेली असतात. ओढे नाले दुथडी भरून खळखळ वाहत असतात. यंदा हे चित्र पाहायला मिळाले नाही.

तालुक्यात काही शेतकऱ्यांनी मोटारीच्या सहाय्याने पाणी खाचरांमध्ये तुंबवून भात लावणी केली. ज्यांची भाताची पिके लवकर लावणीला आली होती त्यांनी सुरूवातीच्या पावसात थोडीफार लावणी करून घेतली होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने लावण्या अर्धवट राहिल्या. लावणीसाठी खाचरांमध्ये पाणी नसल्याने चिखल करता येत नाही. पाऊस जर असाच राहिला तर भात पिकांवर परिणाम होवून भाताचे उत्पन्न घटण्याची शक्यता नाकरता येत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.