७९ वर्षीय वृध्दाला कोरोनाची बाधा
वेल्हे(प्रतिनिधी)– पानशेत भागातील कोरोना प्रादुर्भावासाठी बहुचर्चित असलेले निगडे मोसे (ता.वेल्हे) या गावात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून एका ७९ वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने निगडे मोसेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.
या बाधित रुग्णावर नुकतीच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हृदयशस्त्रक्रिया झाली होती. ३ जुलै २०२० रोजी शस्त्रक्रियेनंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी आल्यावर आठवडाभरानंतर त्रास होऊ लागल्याने स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणी अहवालात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिध्द झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा युध्द पातळीवर काम करत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी सांगितले.
वेल्हे बुद्रूक येथील बाजारपेठेत एक रुग्ण सापडल्याच्या चर्चेला शनिवारी उधाण आले होते. परंतु मूळ वेल्हे बुद्रूकचा रहिवासी असला तरी त्याचा संपर्क पुण्यातच होता. त्यामुळे सदरील रुग्णाच्या संपर्कातील एकही व्यक्ती वेल्हे तालुक्यात नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी सांगितले.
पानशेत परिसरात दोन आठवडे आधी कादवे या ठिकाणी दोन व्यक्तींना करोनाची लागण झाली होती.त्यानंतर गेली दोन आठवडे एकही करोना रूग्ण आढळला नव्हता.त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यात व त्यावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाला यश आले होते.परंतू निगडे मोसे येथे पुन्हा एकाला करोनाची लागण झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली.सध्या वेल्हे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३९ वर पोचली असून ३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ३ जणांवर उपचार चालू असल्याचे डॉ. देवकर यांनी सांगितले.