तालुक्यात करोना आटोक्यात
वेल्हे (प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्यात मागील काही दिवसापासून करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात पसरला होता. करोना आटोक्यात येतो की नाही अशी भिती व्यक्त केली जात होती, परंतू या भीतीला छेद देत तालुका प्रशासनाने करोना आटोक्यात आणला आहे.
रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. त्यामुळे वेल्हे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहीले होते. हे आव्हान पेलत करोनाचा फैलाव रोखण्यास यश आले. आज दिवसभरात केवळ दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मंगळवार दि.२८ रोजी निगडे मोसे व ओसाडे प्रत्येकी एका व्यक्तीस लागण झाली असल्याची माहिती वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली. तालुक्यातील करोना पॉजिटिव्ह संख्या ११८ झाली असून ६९ जण बरे झाले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ४७ जणांवर उपचार चालू आहेत.