* संतप्त पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
* शिक्रापूरचा कचरा प्रश्न चिघळणार
* धुरामुळे नागरिकांसह रुग्ण हैराण
शिक्रापूर (वार्ताहर)- येथे गावातील संकलित केलेला सर्व कचरा मानवीवस्तीजवळच गोळा करून पेटविला जात आहे. त्यामुळे धुरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक दिवसांपासून मागणी करून देखील कचऱ्याची समस्या मार्गी लागत नसल्याने अखेर ग्रामस्थ व महिला आक्रमक झाल्या आहेत. संतप्त पदाधिकाऱ्यांनी कचरा वाहतूक करणारी वाहने रोखून धरली. त्यामुळे शिक्रापूरची कचरा समस्या चिघळण्याची चिन्हे दिसून येत आहे.
याबाबत नुकतेच पुणे प्रादेशिक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या मीना सोंडे, माजी सदस्य सुभाष खैरे, भाजपाचे उपाध्यक्ष प्रकाश सोंडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा गायकवाड, अर्चना गजरे, सुनील शिर्के, दाउद इनामदार, बाजीराव चव्हाण, रोहिदास जाधव आदींनी धाव घेत कचरा वाहतूक करणारी वाहने रोखली आहेत. यावेळी हा कचरा कायमस्वरूपी हटविण्याची मागणी केली आहे.
शिक्रापूर येथे गावातील गोळा होणारा कचरा अनेक वर्षांपासून वेळ नदीपात्रामध्ये जाळून विल्हेवाट लावली जात आहे. परंतु जाळलेल्या कचऱ्याच्या धुराचा सोंडेमळा, महाबळेश्वनगर, ग्रामीण रुग्णालय परिसर, कुंभारवाडा, परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. धुरामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागला आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर देखील कचराभूमीपासून काही अंतरावर आहे. त्यामुळे संपूर्ण गावकरी वेठीस धरले जात आहे. अनेकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करून देखील कोणताही प्रतिसाद दिला नाही.
अनेकदा जळीत कचऱ्याचे लोट संपूर्ण गावामध्ये पसरत आहेत. त्यामुळे अनेकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. अनेकांना वेगवेगळे आजार झालेले आहेत. डासांचा उपद्रव वाढला आहे. काही अंतरावर ग्रामीण रुग्णालय आहे. रुग्ण व नवजात बालक, महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आठवडे बाजार भरला जात असून बाजारामध्ये येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे. अनेकदा मागणी करून कचरा प्रश्न सोडविला जात नाही. किती दिवस हे चालणार असा सवाल ग्रामपंचायत सदस्या मीना सोंडे यांनी केला आहे.
यावेळी एक आठवड्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा दुसरीकडे हलवावा; अन्यथा आंदोलन करून कचरा गाड्या अडविणार आहे. हा कचरा ग्रामपंचायत कार्यालयापुढे नेऊन टाकणार असल्याचा इशारा संचालक बाळासाहेब चव्हाण, मीना सोंडे, माजी सदस्य सुभाष खैरे यांसह आदींनी दिला आहे.
शिक्रापूर येथे कचरा टाकण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. जागा उपलब्ध होताच हा कचरा दुसरीकडे हलविला जाईल.
– गुलाब नवले, ग्रामविकास अधिकारी, शिक्रापूर.