दोन मैलापर्यंत लागताहेत वाहनांच्या रांगा

सुट्टीच्या दिवशी होतेय वाहतूक कोंडी; ढेबेवाडी फाटा ते जुन्या कोयना पुलापर्यंतची स्थिती
कराड (प्रतिनिधी) – कोल्हापूर नाक्‍यावर होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. मात्र पुण्या-मुंबईहून सुट्टीला गावी आलेले चाकरमानी परतताना या वाहतूक कोंडीत आणखी भर पडू लागली आहे. परिणामी ढेबेवाडी फाटा ते नवीन कोयना पूल या साधारणतः दोन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागतात. शनिवार-रविवारी या वाहतूक कोंडीमुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत.

महामार्गावरील कोल्हापूर ते पुणे या लेनवर कोल्हापूर नाक्‍यावर उड्डाणपूल नसल्याने मोठी समस्या उद्भवू लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग बनवताना झालेली किंवा केलेली चूक याचे दुष्परिणाम गेल्या काही वर्षांपासून दिसू लागले आहेत. दिवसेंदिवस वाहनांची वाढणारी संख्या, महामार्ग देखभाल विभागाचे होणारे दुर्लक्ष, यामुळे मलकापूर ते कराड येथे वाहतूक कोंडी व छोटे-मोठे अपघात होणे, हे आता नित्याचेच बनले आहे. मात्र या वाहतूक कोंडीचा सर्वात जास्त फटका हा मुंबई-पुण्याहून सुट्टीच्या कालावधीसाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना होत असतो. कारण येताना होणाऱ्या वाहतूक कोंडीपेक्षा जाताना कैकपटीने वाहतूक कोंडी होत आहे. शहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत. ढेबेवाडी फाटा ते नवीन कोयना पुल या दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या असतात. ही स्थिती शनिवार, रविवार व लागोपाठ येणाऱ्या सुट्टीदिवशी पहावयास मिळत आहे. साधारणतः सायंकाळी चारनंतर अशी वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात होते.

कोल्हापूर नाक्‍यावर वाहतूक पोलीस तळ ठोकून असतात. मात्र या दरम्यानची वाहतूक कोंडी पोलिसांनी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांना यश मिळत नाही. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. कुर्मगतीने सुरु असलेल्या वाहतुकीमुळे या कोंडीत प्रवाशांना तासनतास अडकून पडावे लागते. यात कराड, मलकापूर शहरासह परिसरात जाणारी लोकही भरडली जातात. वाहतूक कोंडीवर उड्डाणपूल होणे एवढाच पर्याय आता शिल्लक आहे. कारण येणाऱ्या काळात वाहनांच्या संख्येत वाढ होणार असून, जर यावर वेळेत उपाययोजना न केल्यास आत्ता दिसणाऱ्या दोन किलोमीटरच्या रांगा भविष्यात कैक किलोमीटरने वाढतील.

किरकोळ अपघात, पोलीस ठाण्यात वरात
वाहनांच्या रांगा लागत असल्याने मोटारी कासवगतीने चालवाव्या लागत आहेत. त्यातही बऱ्याच वेळा महागड्या मोटारींना धडक बसते, नुकसान होते. परिणामी वाहतूक कोंडीतून मार्ग काढून दोन्ही वाहनधारकांची वरात पोलिस ठाण्यात पोहोचते. आधी वाहतूक कोंडी, त्यात पोलीस स्टेशन. त्यामुळे अशा वाहनधारकांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)