वाहनचालकांकडून फास्टॅग वापरास बगल
गर्दी टाळण्यासाठी वाहनचालकांची फास्टॅग लेनमध्ये घुसखोरी
दुप्पट टोल वसूल करण्यास सुरुवात
पुणे – ऑनलाइन पद्धतीने टोल भरण्यासाठी वाहनांना फास्टॅग अनिवार्य करूनही फास्टॅगधारकांची संख्या वाढत नाही. त्यामुळे, आता वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. कॅशधारकांसाठी टोलवर स्वतंत्र लेन असून या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या असते. यामुळे लेनमधील गर्दी टाळण्यासाठी एखादा वाहनचालक फास्टॅग लेनमधून पुढे गेल्यास त्याच्याकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येत असल्याचे एनएचएआय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रवासी व मालवाहतूक वाहनांचा टोल ऑनलाइन पद्धतीने भरून पारदर्शकता यावी, टोल नाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी होऊन वेळेची बचत व्हावी, यासाठी केंद्र शासनाने ऑनलाइन टोल रक्कम भरण्यासाठी फास्टॅग सुविधा सुरू केली.
सुरवातीला 1 डिसेंबरपासून टोलनाक्यांवर फास्टॅग बंधनकारक केले होते. मात्र, फास्टॅग कार्यान्वित न केलेल्या वाहनांची संख्या मोठी असल्याने ही मुदत 15 जानेवारीपर्यंत वाढवली. यानुसार आता टोलनाक्यांवर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, फास्टॅग अनिवार्य केल्यानंतरही प्रत्यक्ष वाहनांना फास्टॅग बसवून घेणाऱ्यांची संख्या कमीच आहे. सध्या 50 टक्के वाहनचालक विना फास्टॅग धावत असल्याचे एनएचएआय प्रशासनाचा निष्कर्ष आहे.
यामुळे फास्टॅग धारकांचे प्रमाण वाढवण्यासाठी आता प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून टोलनाक्यांवर कॅशधारकांसाठी दोन लेन सोडण्यात आल्या आहेत. तर, फास्टॅग धारकांसाठी उर्वरित 4 ते 5 लेन आहेत. यामुळे फास्टॅग असलेली वाहने टोलवरून लवकर निघून जातात. याउलट फास्टॅग नसलेल्या लेनवर वाहनधारकांना गर्दीचा सामना करावा लागतो. यातच फास्टॅग नसलेला एखादा वाहनचालक फास्टॅग लेनमध्ये घुसल्यास त्याच्याकडून दुप्प्पट टोल वसूल करण्यात येत असल्याचे एनएचएआय अधिकाऱ्यांनी सांगितले.
…तर रिटर्नसाठी जादा टोल
टोलनाक्यावर टोल भरताना चोवीस तासांच्या आता माघारी येण्यासाठी रिटर्न पावती उपलब्ध असते. रिटर्न पावती घेणाऱ्या वाहनधारकांना कमी दरात दिली जाते. मात्र, आता फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांना रिटर्नचा कमी दरातील लाभ दिला जात नाही.
फास्टॅगधारक वाहनधारकांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून नुकतेच फास्टॅग नसलेल्या आणि फास्टॅग लेनमधून येणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
– सुहास चिटणीस, प्रकल्प अधिकारी, एनएचएआय