वाहनांमध्ये कोंबून चालतेय विद्यार्थ्यांची वाहतूक

पोलिसांसह पालकांचे दुर्लक्ष; आरटीओकडून बघ्याची भूमिका

नगर  –
विद्यार्थी वाहतूक करताना एका वाहनात किती विद्यार्थी असावेत, याचे नियम घालून दिले असतांना मूठभर सोडले तर सर्रास विद्यार्थ्यांची वाहतूक करताना त्यांना गाडीत कोंबून बसवलं जात असल्याचं चित्र दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे चित्र धोकादायक आहे. याकडे पालक, शाळा प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागकडून याकडे बघ्याची भूमिका घेण्यात येत आहे.

घर आणि शाळांतील अंतर, विस्तारलेल्या भागांमुळे शहराच्या हद्दीवर असलेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांना नियमित वेळेत ने – आण करण्यात पालकांना आलेलं अपयश यातून विद्यार्थी वाहतूक अस्तित्वात आली. एकाच गाडीत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवले तर त्यामुळे परस्परांबरोबर वाद, संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची भीती असते. आपले पाल्य कमी गर्दी असलेल्या वाहनातून जाईल, अशी खबरदारी पालकांनी घेतली तर भविष्यातील मोठे धोके टाळणं सहज शक्‍य होईल.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला दोन दरवाजे असले पाहिजेत, अशी सक्‍ती करण्यात आली आहे. रिक्षात बसल्यानंतर विद्यार्थी परस्परांशी दंगा करताना काही अपघात होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. काही रिक्षांनी असे दार बसवलेही आहेत. पण काही रिक्षातून संकटकालीन बाहेर कसं पडावं? हा प्रश्न आहे.

दरम्यान, अनेक व्हॅन काचा लावून बंद केल्या जातात. त्यामुळे कोंदट वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांचा श्वासही गुदमरतो. हा त्रास विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांत होतो. ज्येष्ठांकडे जबाबदारी नकोच विद्यार्थी वाहतूक करणारी एक रिक्षा काही महिन्यांपूर्वी पलटी झाली. यात विद्यार्थ्यांसह वयस्क चालकही जखमी झाले. चालकाला समोरून आलेले वाहन चुकविता न आल्याने हा अपघात झाला. याविषयी कुठंही तक्रार दाखल झाली नाही. मात्र, काही दिवस विद्यार्थ्यांची शाळा बुडली. वयोमानानुसार येणारे आजारपण आणि शारीरिक हालचालींवर येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन ज्येष्ठांनी ही जबाबदारी टाळणे आवश्‍यक आहे. शहराच्या विस्तारलेल्या भागात शाळांची स्थापना करण्यात आली आहे. बोटावर मोजण्याइतक्‍याच शाळा शहराच्या हद्दीत आहेत.

वेळे आधीच मुले घराबाहेर
शहराच्या वेगवेगळ्या टोकापासून विद्यार्थी गोळा करत वाहनधारक येतात. त्यामुळे शाळेच्या तब्बल एक ते दीड तास आधी विद्यार्थ्यांना घराबाहेर पडावे लागते. एकेक विद्यार्थी गोळा करून मग सगळे एकत्र शाळेत जातात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.