पिंपरी – पिंपळे गुरव परिसरात रस्त्यावर लावलेल्या तीन वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. काही दिवसांपूर्वीच नवी सांगवी येथे देखील अशाच प्रकारे वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. वाहने फोडण्याच्या घटनेची सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुनरावृत्ती झाली आहे.
पिंपळे गुरव येथील कल्पतरु सोसायटीच्या समोर नेहमीप्रमाणे वाहने पार्क करुन ठेवली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने पार्क केलेल्या वाहनापैकी 3 कारच्या काचा फोडल्या. या गाड्यांच्या चारही बाजूच्या काचा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हा प्रकाराबद्दल रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.
सांगवी, पिंपळे गुरव या परिसरात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात लहान-मोठ्या इमारतींची संख्या खूप अधिक आहे. परंतु पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. याचाच गैरफायदा घेत गुंड प्रवृत्तीचे वाहणांची तोडफोड करीत आहे.