High-Security Registration Plate (HSRP) | केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.
देशातील वाहन उत्पादकांना एक एप्रिल २०१९ पासून वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ देणे बंधनकारक केले आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०१८ मध्येच दिले होते. आता राज्य परिवहन विभागाने राज्यातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ लावून घेणे बंधनकारक केले आहे.
हाई सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नेमकं काय आहे?
हाई सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेटवर इंडिया असे मुद्रीत केले जात असून याशिवाय निळ्या रंगात अशोक चक्र आहे. नंबर प्लेट विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात. या नंबर प्लेटवर परावर्तित रंग आहेत. जे प्रकाशात सहज कॅप्चर होतात. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. त्यावर इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो या नंबर प्लेटस युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्रदर्शित करत असतात.
हा कोड प्रत्येक वाहनासाठी भिन्न असतो. नंबरप्लेट वाहनाला लावल्यानंतर पुन्हा काढता येत नसून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नंबरप्लेट बनविलेली असते. त्यामुळे नंबरमध्ये छेडछाड करता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्वच वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक नंबरप्लेट अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बुकींग पोर्टल कार्यान्वित
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे शुल्क
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे शुल्क दुचाकी वाहनांसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, कारसाठी १ हजार १०० रुपये व ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये आहे.
काय होणार फायदा?
– जर एखाद्या वाहनाचा अपघात झाला तर वाहनाच्या मालकासह सर्व आवश्यक माहिती हाई सिक्योरिटी नंबर प्लेटवरून मिळते. यासह, वाहन चालकाच्या कुटूंबियांना माहिती दिली जाऊ शकते.
– जर ही प्लेट तुटली तर ती जोडली जाऊ शकत नाही. कोणीही या प्लेटची कॉपी करू शकत नाही आणि बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्यामुळे नंबर प्लेटची चोरी किंवा दुसर्या वाहनाचा गैरवापर होण्याची शक्यता खूपच कमी आहे, जी आपल्या वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
दंडात्मक कारवाई होणार
वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, वित्त बोजा उतरविणे, चढविणे, दुय्यम आरसी, विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येतील. हाय सिक्युरीटी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिवहन कार्यालयाने दिली आहे.
हेही वाचा: