2019 मध्ये 2 लाख 45 हजार 097 वाहनांची नोंद
मागील चार वर्षांमध्ये यंदा सर्वांत कमी नोंदणी
पुणे – “सायकलचे शहर’ अशी ओळख असणाऱ्या पुणे शहराची ओळख मागील काही वर्षांमध्ये “मोटारींचे शहर’ अशी झाली आहे. मात्र, यंदा वाहन नोंदणीमध्ये तब्बल 12.24 टक्क्यांची घट झाली आहे.
परिवहन मंत्रालयाच्या “वाहन’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, सन 2019 मध्ये 2 लाख 45 हजार 097 वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील चार वर्षांमध्ये यंदा सर्वांत कमी नोंदणी झाली आहे.
हलकी मोटार वाहने, हलकी मालवाहू वाहने, अवजड मोटार वाहने, अवजड मालवाहू वाहने, तीनचाकी वाहने, हलकी प्रवासी वाहने, दुचाकी आदी नव्याने खरेदी केलेल्या आणि जुन्या (हस्तांतरित केलेल्या) वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये करणे बंधनकारक असते.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत सन 2019 मध्ये नोंदणी झालेल्या 2 लाख 45 हजार 97 वाहनांपैकी सन 2019 मध्ये प्रामुख्याने 1 लाख 65 हजार 30 दुचाकी (नॉन ट्रान्स्पोर्ट), 49 हजार 963 हलकी मोटार वाहने, 13 हजार 043 प्रवासी तीनचाकी वाहनांचा समावेश आहे.
तर सन 2018 मध्ये नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने 1 लाख 89 हजार 265 दुचाकी (नॉन ट्रान्स्पोर्ट), 51 हजार 55 हलकी मोटार वाहने, 19 हजार 308 प्रवासी तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. वाहनांमधून “कार्बन मोनोक्साईड’, “पर्टिक्युलेड मॅटर’, “सल्फर ऑक्साईड’, “हायड्रो कार्बन’ सारखे घातक वायू उत्सर्जित होतात. यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागते. यंदा वाहन नोंदणी कमी झाल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले.