फास्टॅग यंत्रणा नसल्याने टोलनाक्‍यावर वाहनांच्या रांगा

संगमनेर  – फास्टॅग नसल्याने पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावासा टोल नाक्‍यावर सलग तीसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा लागल्या. फास्टॅग स्कॅन होत नसल्याच्या तक्रारी टोल नाक्‍यांवर रविवारपासून करण्यात येत आहे. तूर्तास टोल भरण्यासाठी दोन्ही बाजूंनी दोन लेन उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या, तरी फास्टॅग नसल्याने टोलनाक्‍यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने रविवारपासून (दि.15) टोलनाक्‍यांवर ‘फास्टॅग’च्या अमंलबजावणीला सुरुवात केली आहे. परंतु, अजूनही बहुतांश वाहनधारकांनी फास्टॅग घेतलेले नाही. पहिल्या दिवसापासून फास्टॅग अंमलबजावणीचा टोलनाक्‍यांवर फज्जा उडाला. सोमवारी व मंगळवारी देखील थोड्याबहुत फरकाने अशीच परिस्थिती असल्याचे पहावयास मिळाले. टोलचे पैसे रोखीने देण्यासाठी केवळ एकच लेन खुली करण्याचे प्राधिकरणाचे धोरण असले, तरी फास्टॅग नसलेल्या वाहनांची संख्या अधिक असल्याने दोन लेन रोखीने पैसे स्वीकारण्यासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, एसटीच्या सर्वच आगारांच्या बसला फास्टॅग लावण्यात आले आहे. मात्र आगारातून फास्टॅगसाठी काढलेल्या खात्यात रक्कम ठेवली नसल्याने बऱ्याच एसटीचा फास्टॅग काम करत नाही. त्यामुळे पहिल्यादा एसटीचालकांना फास्टॅग लेनवर आपली बस न्यावी लागते त्यानंतर फास्टॅग काम करीत नसल्याने पुन्हा बस टोलचे पैसे रोखीने देण्याच्या लेनमध्ये उभी करावी लागते. यात प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर बसची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे टोलनाक्‍यावर वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागत आहे.

फास्टॅगची सक्ती केल्याने 15 डिसेंबरपासून ज्या वाहनधारकांनी अद्याप वाहनांना फास्टॅग लावलेला नाही, त्या वाहनांमुळे टोल नाक्‍यावर वाहनांची मोठी गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत आहे. परिणामी ज्यांचा टोलशी संबंध नाही अशा दुचाकीस्वारांना यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. दळणवळणातदेखील अडचण निर्माण होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.