महसुलाच्या बाबतीत मात्र गोडवा वाढला
पुणे – गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर वाहन खरेदीला गर्दी दिसत असली, तरी प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदाची वाहन खरेदी काही अंशी घटल्याचे दिसून येते. पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे यावर्षी एकूण 7 हजार 198 वाहनांची नोंद झाली आहे.
साडेतीन मुहुर्तांपैकी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर वाहन घरी आणण्यासाठी जवळपास आठवडाभर आधीपासून खरेदीची प्रक्रिया सुरू होते. गेल्या वर्षी 7 हजार 279 वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालय(आरटीओ) मध्ये झाली होती. यंदा यामध्ये घट होऊन 7 हजार 198 वाहनांची नोंदणी झाली. यावर्षी वाहनांची नोंदणी जरी कमी झाली असली, तरी मात्र आरटीओचे महसूल उत्पन्न 31 कोटी 40 लाख 42 हजार 823 रूपयांवरून यावर्षी 33 कोटी 11 लाख 38 हजार 904 रुपयांवर गेले आहे.
शहरातील वाहनसंख्या सुमारे 40 लाखांपेक्षा जास्त आहे. “एक व्यक्ती, एक वाहन’ या सूत्राचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना देखील सणांच्या निमित्ताने वाहनांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहराच्या वाहतूक कोंडीमध्ये अजूनच भर पडणार आहे. यावर्षी चारचाकी वाहनांच्या संख्येत झालेली वाढ पाहता पुणेकरांना पार्किंगच्या समस्येलाही तोंड द्यावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.