ठेकेदारांच्या मनमानीला बसणार चाप
पुणे – वाहनतळे आता महापालिकेकडूनच चालविली जाणार आहे. त्यासाठी कंत्राटी कामगार उपलब्ध करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शहरात महापालिकेची प्रमुख 22 वाहनतळे असून ती ठेकेदारांच्या माध्यमातून चालविण्यात येतात.
पुणेकरांना वाहनतळांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पालिकेने विकास आराखड्यातील आरक्षित जागांवर वाहनतळे विकसित केली आहेत. मात्र, त्यासाठी मनुष्यबळ नसल्याने ठेकेदारी पद्धतीने ही वाहनतळे निविदा काढून चालविण्यास देते.
मात्र, गेल्या काही वर्षांत ठेकेदारांकडून भाडे थकविणे, महापालिकेने ठरवल्यापेक्षा अधिक शुल्क वसूल करणे, नागरिकांना दमदाटी करणे या वाहनतळाच्या जागा एखाद्या शोरूमला नवीन वाहने ठेवण्यासाठी परस्पर उपलब्ध करणे असे प्रकार वाढले आहेत. तसेच त्याच्या तक्रारीही येत आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
मागील महिन्यात थकबाकी असल्याने मंडई येथील सतीश मिसाळ पार्किंग महापालिकेने सील केले होते. त्यानंतर पालिकाच हे पार्किंग चालवत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने मुदत संपणारी पार्किंग पुन्हा ताब्यात घेऊन त्यासाठी कंत्राटी कर्मचारी नेमले जाणार असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.
नागरी सुविधांची कमतरता
ठेकेदारांना दिलेल्या वाहनतळांचे काही दिवसांपूर्वी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या ठिकाणी अनेक नागरी सुविधांची कमतरता असल्याचे समोर आले आले होते. त्यानंतर या सुविधा ठेकेदारांना देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, अजूनही असुविधांचा पाढा कायम असून हे पार्किंग पालिकाच चालवायला लागल्यास त्यासाठी चांगल्या सुविधाही देणे शक्य होणार आहे.