वाहन परवाना वेटींग लिस्ट होणार कमी

फुलेनगर येथील टेस्ट ट्रॅकवर सोमवारपासून होणार चाचणी

पुणे – भोसरी येथे आयडीटीआर येथे चारचाकी वाहन चालविण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या परवान्याच्या चाचणीसाठी एकच ट्रॅक असल्याने परवाना काढणाऱ्यांची वेटींग लिस्ट दिवसेंदिवस वाढत होती. यावर तोडगा काढण्यासाठी फुलेनगर येथील ट्रॅकवर येत्या सोमवारपासून (दि.18) पासून 160 चारचाकी वाहनांची चाचणी घेण्यात येणार आहे. यासह शिकाऊ परवान्याचा कोटादेखील 300 हून 600 केला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

मागील काही वर्षांपूर्वी आळंदी रोड येथील फुलेनगर येथे चारचाकी वाहनांची चाचणी घेण्यात येत होती. मात्र, आयडीटीआर येथे ड्रायव्हींग टेस्टसाठी ट्रॅक तयार केल्यामुळे फुलेनगर (आळंदी रोड) येथील ट्रॅक बंद ठेवण्यात आला होता. मात्र, येत्या सोमवारपासून दि. 18 पासून हा ट्रॅक प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी 8 वाजल्यानंतर यासाठी अपॉईन्टमेंट घेता येणार आहेत. उमेदवारांनी “सारथी’ या संकेतस्थळावर जाऊन “अपॉइन्टमेंट टू आरटीओ’ हा पर्याय निवडावा. यानंतर परवाना चाचणीसाठी फुलेनगर कॅम्प हा पर्याय निवडणे आवश्‍यक आहे, असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनधारकांना शिकाऊ, कायमस्वरुपी परवाना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला जातो. यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यावर परीक्षेची तारीख मिळते. परवाना काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर सुमारे 2 ते अडीच महिन्यांनी परीक्षेची तारीख मिळत होती. परवाना काढण्यासाठी पूर्वनियोजित वेळ आणि तारीख मिळत नसल्याने नागरिकांची प्रतिक्षा यादी दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे नागरिक आणि ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनकडून कोटा वाढवण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. या मागणीचा विचार करत आरटीओकडून शिकाऊ आणि पक्‍क्‍या परवान्याच्या कोट्यामध्ये जून महिन्यापासून सातत्याने वाढ करण्यात येत आहे.

वाहन चालविण्यासाठी आवश्‍यक असणारा परवाना काढण्यासाठी उमेदवारांना महिनोंमहिने वाट पाहावी लागत होती. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चाचणी कोटा वाढविला आहे. आरटीओमध्ये लायसन्ससाठी “झिरो वेटींग’ व्हावे यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्नशील आहोत. नागरिकांना 3 दिवसांमध्ये लायसन्स मिळावे, असा आरटीओचा प्रयत्न आहे.
– अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)