वडगाव मावळ – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहन परवाना शिबिरामुळे मावळ तहसीलदार कार्यालय परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने स्वतंत्र जागा उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने प्रत्येक महिन्याला शिकाऊ व पक्के वाहन परवाना शिबिर घेण्यात येते. मावळ तहसील कार्यालय परिसरात पोलीस स्टेशन, उप भूमी अभिलेख, वनपरिक्षेत्र कार्यालय, नागरी सुविधा केंद्र, पशुधन दवाखाना, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, महाविद्यालय, भाजप कार्यालय आदी असल्याने परिसरात दैनंदिन वाहतूक कोंडी होत असते.
त्यातच वाहन परवाना शिबीर होत असल्याने दुचाकी व चारचाकी तसेच नागरिकांची मोठ्याप्रमाणात वर्दळ होत असल्याने विद्यार्थी, महिला, नागरिक यांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागत आहे. मावळ तहसील कार्यालयाच्या महसूल भवनमध्ये कार्यक्रम असल्यास पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांना धावपळ करावी लागत आहे. या शिबिराच्या वेळी आलेल्या नागरिकांना उन्हात थांबावे लागते, त्यांना पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था नाही.
महिन्यातून एकदाच शिबिर असल्याने गर्दी
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मावळ तालुक्यातील वाहन परवाना शिबिर घेण्यासाठी मोकळे मैदान उपलब्ध व्हावे. तसेच वाहन परवाना शिबिर महिन्यातून दोनदा घेण्यात यावे. मावळ तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याची मागणी नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, सुनीता भिलारे, दीपाली मोरे, शिवसेना नेते बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शरद मोरे, हरीश दानवे, दिनेश पगडे आदींनी केली.